विशेष शाखा गेली कुठे?

Riot
Riot

औरंगाबाद - शहरातील गंभीर घटना, घडामोडी, दंगल, विशेष गटांच्या कारवाया आणि हालचालींची गोपनीय माहिती व अहवाल देण्याचे काम पोलिसांची विशेष शाखा करते; मात्र मागील काही महिन्यांत अनेक गंभीर घटना घडण्यापूर्वी त्यांची गोपनीय माहिती मिळवण्यास ही शाखा अपयशी ठरली. 

परिणामी, ठोस माहितीअभावी विशेष शाखेला संभाव्य घटना रोखता आल्या नाहीत. त्याचा फटका शहराला बसत आहे. 

शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस फौजेआधी विशेष शाखेचे आहे. घटना घडण्यापूर्वीच्या हालचालींची माहिती गोळा करणे व संभाव्य गैरकृत्यांवर आळा घालण्यासाठीची महत्त्वपूर्ण जबाबदारी विशेष शाखेवर आहे. सद्यःस्थितीत विशेष शाखेतील मोजक्‍याच कर्मचाऱ्यांचा शहराशी ‘कनेक्‍ट’ आहे. त्यामुळे शहराच्या पार्श्‍वभूमीचा अभाव, मिळवली जाणारी वरवरची माहिती याचा फटका शहराला बसत आहे. याची प्रचिती शहरात जानेवारीपासून होत असलेल्या घटनांवरून येते.

याचा मागमूसही नाही
नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरण व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित मारेकऱ्याला शहरातून अटक होते. एटीएस आणि सीबीआय शहरात कारवाया करतात. गत अनेक वर्षांपासून संशयित शहरात उजळ माथ्याने फिरतात; परंतु विशेष शाखेला व पोलिसांच्या दहशतवादविरोधी सेलला मागमूस नसावा, ही चिंतेची बाब आहे.  

‘एसआयटी’वरही प्रश्‍नचिन्ह 
यंदा जानेवारीपासून शहराच्या कायदा सुव्यवस्थेला तडे जात आहेत. यातच गुप्तवार्ता विभागाकडूनही विशेष कामगिरी झाली नाही. पोकळ अहवालाची बोळवण झाली. याचा शहर सुरक्षेवर मोठा परिणाम झाला.

महत्त्वाच्या घटना व कंसात परिणाम 
  २ जानेवारी : भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचाराचे शहरातील पडसाद, परिणाम या बाबीच्या माहितीचा विशेष शाखेकडे अभाव होता. (तीन दिवस दगडफेक व हिंसाचारात शहर धुमसले.)
  ७ जानेवारी : मिटमिटा येथे कचराप्रश्‍नावरून झालेला हिंसाचार. (चाळीसपेक्षा अधिक वाहनांची राखरांगोळी, अनेक नागरिकांसह पोलिसही जखमी.)
  ११ व १२ मे : जुन्या औरंगाबादेत दंगल झाली. तत्पूर्वी दोन गटांत शहागंज भागात मारहाणीचा प्रकार घडला होता. या घटनेकडे त्याचवेळी गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी नंतर दंगल झाली. (सामाजिक सलोख्यावर प्रश्‍नचिन्ह, दहा कोटींपेक्षा अधिक नुकसान, दोनजणांचा मृत्यू. शहराची कधीही न भरून निघणारे नुकसान)
  ९ ऑगस्ट : वाळूज येथे औद्योगिक वसाहतीत झालेली तोडफोड. (तीनशे कोटींपेक्षा अधिक नुकसान)
  १८ ऑगस्ट : सचिन अंदुरेची अटक. त्याच्यासह इतर स्लीपर सेलबाबतची माहिती विशेष शाखेकडे नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com