धोका वाढला, काळजी घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

औरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. उन्हापासून कसा बचाव करावा, काय करावे, काय करू नये, याबाबत माहिती देणारे एक हजार पोस्टर्स शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली आहेत. 

यंदा शहरात मार्च महिन्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. वातावरणातील बदलामुळे वर्षानुवर्षे तापमानात वाढ होत असून, नागरिकांना दुपारच्या वेळी उन्हाचा प्रचंड त्रास जाणवत आहे. त्यामुळे उन्हाचा फटका बसून मृत्यू ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

उष्माघाताची लक्षणे
थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे. 
भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे. 
रक्‍तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता.

अशी घ्या काळजी 
वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. 
थोड्या अंतराने सावलीत विश्रांती घेऊनच पुन्हा काम करावे.
कष्टाची कामे सकाळी लवकरच अथवा संध्याकाळी करावीत. 
उष्णता शोषूण घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. 
सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनाचा वापर करावा. 
पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. तसेच रसदार फळेही खावीत
गॉगल्स, डोक्‍यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे, सनकोट यांचा वापर करावा. 
उन्हाचा फटका बसल्यास रुग्णाला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी.

Web Title: risk of heat stroke increased