देशमुखांच्या उडालेल्या कर्जबोजाची कोट्टीच्या कोटी उड्डाणे

विकास गाढवे
Monday, 9 December 2019

कर्जबोजावरून वेगवेगळे अर्थ काढण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदीचा अर्थ समजून घेतला असता तर सातबाराचे बारा वाजले नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

लातूर : सातबारावरील नोंदीबाबत माहिती नसल्याने अभिनेता रितेश देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्या साताबारावरील चार कोटी ७० लाखाच्या कर्जबोजाचे प्रकरण पाच महिन्यापासून सतत वेगळे वळण घेत आहे. कर्जबोजावरून वेगवेगळे अर्थ काढण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदीचा अर्थ समजून घेतला असता तर सातबाराचे बारा वाजले नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सातबारावरील कर्जबोजाची नोंद जुनी असून दीड वर्षापूर्वीच कमी करण्यात आली आहे. कंसात असलेली नोंद सातबारावर दहा वर्ष टिकून रहाते. कर्जबोजा काढल्याचा फेरफार क्रमांकही कंसाच्या पुढे नमूद केला आहे. हे कळून न आल्याने उडालेल्या कर्जबोजाची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली आहेत. त्याचे काय आहे नेमके प्रकरण?

No photo description available.
हाच तो फेरफार क्रमांक 1326

देशमुख बंधूनी बाभळगाव (ता. लातूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मार्फत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कृषी यांत्रिकीकरणात ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी चार कोटी ७० लाख ६४ हजार १९५ रूपयाची कर्ज मागणी केली. बॅंकेने मंजूर केल्यानंतर कर्जाचा बोजा देशमुख बंधूच्या सारसा (ता. लातूर) शिवारातील गट क्रमांक १३१/१ वरील सातबारावर टाकण्यात आला होता. या कर्जाची परतफेड केल्यानंतर बॅंकेने २८ डिसेंबर २०१७ रोजी वांजरखेडा तलाठ्यांना पत्र देऊन बोजाची नोंद कमी करण्यास सांगितले. त्यानुसार तलाठ्याने सात फेब्रुवारी २०१८ मध्ये ही कर्जबोजाची नोंद फेरफार (क्रमांक १३२६) घेऊन कमी केली. यामुळे नोंदीला कंस (ब्रॅकेट) पडला आहे.

फेरलेखन होईपर्यंत नोंद राहणार

महसूल विभागाच्या कार्यपद्धतीनुसार सातबाराचे दर दहा वर्षांनी फेरलेखन केले जाते. त्यानंतर कंसामधील नोंदी पुन्हा लिहिल्या जात नाहीत. केवळ अस्तित्वात असलेल्याच नोंदी लिहिल्या जातात. यामुळे एखाद्या व्यक्तीने जमिनीची विक्री दुसऱ्या व्यक्तीला केल्यानंतर फेरफार होऊन जमिन विक्री करणाऱ्याच्या नावाला कंस (हस्तलिखित सातबाराववर आळा तर संगणकीय सातबारावर कंस) पडतो व कंसापुढे (ब्रॅकेट) फेरफार क्रमांक होऊन जमिन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव सातबारावर येते.

मराठवाड्यातील महिलांची मध्य प्रदेशात विक्री करणारा हा होता नराधम

२००१ मध्ये हा व्यवहार झाला असेल तर कंसाती नोंद सातबाराचे फेरलेखन (पुनर्लेखन) होईपर्यंत सन २०११ पर्यंत रहाते. फेरलेखनानंतर कंसातील नोंद पुन्हा घेतली जात नाही व केवळ खरेदी करणाराचे नाव खरेदी केलेल्या जमिनीच्या क्षेत्रासमोर रहाते. याप्रमाणे देशमुख बंधूंच्या सातबारावरील कर्जबोजाच्या नोंदीचे झाले आहे. ही नोंद सन २०२१ पर्यंत सातबाराचे फेरलेखन होईपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पूर्वी हस्तलिखित सातबारावर मोठ्या संख्येने नोंदी होऊन नव्या नोंदी लिहिण्यासाठी जागा उरत नसल्याने सातबाराचे फेरलेखन दहा वर्षांनी केला जात होते. आता संगणकीय सातबाराचे फेरलेखन होईपर्यंत देशमुख बंधूंच्या सातबारावरील कर्जबोजाच्या वावड़्या उठतच राहणार आहेत.

अशा उठल्या वावड्या

सातबारा ऑनलाईन झाल्याने तो कोणालाही कोठूनही पहाता येतो. याच पद्धतीने देशमुख बंधूंचा सातबारा सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यावरील कर्जबोजाच्या नोंदीवरून सुरवातीला जमिनीच्या कमी क्षेत्रावर एवढे मोठे कर्ज देतो येते का, असा  प्रश्न उपस्थित करून वावड्या उठल्या. जिल्हा बॅंकेकडून कसा भेदभाव केला जात असल्याचेही आरोप झडले. आता सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असल्याची चर्चा होत आहे. या कर्जमाफीवरून वावड्यांना फोडणी बसली.

बायकोला चांगले वागवीन म्हणाला, म्हणून...

नवीन सरकार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा या सातबारावरील कर्जबोजाने डोके वर काढले. जमिनचे गहाणखत करून देऊन काढलेल्या कर्जबोजाची नोंद सातबारावर होतच असते. यात गृह कर्ज, व्यवसायाचे कर्ज आदीच्या नोंदी असतात. मात्र, काहींनी देशमुख बंधूंनी न उललेले कर्ज शेती कर्ज असल्याचे समजून त्यांना तेवढ्या कर्जाची माफी मिळणार असल्याच्या वावड्या उठवल्या आणि पुन्हा एकदा कर्जबोजाची नोंद तेजीत आली. साताबाराप्रमाणे फेरफारही ऑनलाईन दिसत असता तर ही गडबड झाली नसती, असेही काहींना वाटते.

सातबारावरील कोणतीही नोंद कमी झाल्यानंतर नोंदीच्या दोन्ही बाजूने कंस (ब्रॅकेट) केला जातो. कंसापुढे ज्या फेरफारावरून नोंद कमी त्याचा क्रमांक दिला जातो. फेरफार क्रमांकामध्ये संपूर्ण तपशील असतो. याच पद्धतीने रितेश देशमुख व अमित देशमुख यांच्या सातबारावरील कर्जबोजाची नोंद कमी केली असून त्यापुढे फेरफार क्रमांक नमूद आहे. कंसातील नोंद म्हणजे कमी झालेली असते, याची माहिती नसलेल्यांकडून चुकीचे समज पसरवले जात आहेत.    
- स्वप्नील पवार, तहसीलदार, लातूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Deshmukh Amit Deshmukh Agriculture Loan News of Latur