मुसळधार पावसामुळे इडोळीचा बंधारा फुटला; शेतजमिनींचे नुकसान

मंगेश शेवाळकर
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

मागील तीन दिवसात या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून कयाधु नदीचा प्रवाह वेगाने वाहू लागला आहे. शनिवारीही ( ता. २६ ) हिंगोली तालुक्यात मोठा पाऊस झाला.

हिंगोली : जिल्हा परिषद लघु सिंचनविभागाचा आतताईपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. बंधाऱ्यावर लोखंडी गेट बसवल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा बंधाराच फुटला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. 

हिंगोली तालुक्यात मागील काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीचा पाऊस जोरदार होत असतानाही जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ईडोळी येथील कयाधु नदीच्या बंधाऱ्यावर लोखंडी गेट बसून पाणी अडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, लघुसिंचन विभागाचा आतताईपणा शेतकऱ्यांच्या चांगलाच मुळावर आला आहे.

- नवनीत राणांबद्दल अपशब्द; रवी राणांनी केली मारहाण

मागील तीन दिवसात या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून कयाधु नदीचा प्रवाह वेगाने वाहू लागला आहे. शनिवारीही ( ता. २६ ) हिंगोली तालुक्यात मोठा पाऊस झाला. हिंगोली मंडळात 41 मिलिमीटर, खांबाळा 25, माळहिवरा 43, सिरसम सोळा, बासंबा 8, नरसी नामदेव सहा तर डिग्रस कराळे मंडळामध्ये 52 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या तुफान पावसामुळे विभागात कयाधू नदीच्या बंधाऱ्यावर पाण्याचा दाब आला आणि या पाण्यामुळे बंधारा फुटला.

- आबांचा वारसदार पहिल्यांदाच बारामतीच्या गोविंदबागेत! (व्हिडिओ)

बंधाऱ्याच्या बाजूने सुमारे पंचवीस फूट खोल खड्डे पडले आहे. बंधाऱ्याचा प्रवाह बदलल्याने  परिसरातील शेतकरी नथुजी जाधव, लक्ष्मण जाधव, आशाबाई जाधव, जगन जाधव, पंडितराव जाधव, भास्कर जाधव, तुळशीराम जाधव यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तसेच जमीन खरडून गेली. त्यानंतर हे पाणी परत कयाधू नदीला मिळाले आहे लघु सिंचन विभागाने गेट बसवण्याची घाई केली नसती तर बंधारा फुटला नसता. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे बंधारा फुटल्या बाबत लघु सिंचन विभाग व तहसील प्रशासनाला सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- अंड खायला न मिळाल्याने तिने सोडले पतीला अन् पळाली...

यासंदर्भात शेतकरी आनंदराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात जमिनीचे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाचा एकही अधिकारी पाहण्यासाठी आला नसल्याचे सांगितले. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. आता बंधारा फुटल्याने जमीनही खरडून गेल्याने परिसरातील शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The river bund was destroyed due to heavy rain in Hingoli District