शेतात जाण्यासाठी जीवघेणी कसरत

टेंभुर्णी : येथील जुना डावरगाव रस्ता जीवरेखा नदीतील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पाण्यातून बैलगाडीने जाताना शेतकरी.
टेंभुर्णी : येथील जुना डावरगाव रस्ता जीवरेखा नदीतील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पाण्यातून बैलगाडीने जाताना शेतकरी.

टेंभुर्णी (जि.जालना) - जीवरेखा नदीतील पाण्याखाली गेलेल्या जुना डावरगाव रस्त्यावरून शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. शेतीमालाची ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे, तर महिलांना दोन किलोमीटर वेढा घालून शेतात यावे लागत आहे. 

जालना जिल्ह्यातील जीवरेखा धरणावर पंचमुखी महादेव मंदिरालगत असलेल्या जुना डावरगाव देवी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे मातीकरण आमदार संतोष दानवे यांच्या निधीतून करण्यात आले. मात्र नदीतून जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

यावर्षी झटूबा महाराज मंदिराजवळ नदीवर सिमेंट बंधारा उभारण्यात आल्याने नदीचे पाणी एक किलोमीटर पाठीमागे साचले आहे. यामुळे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. शेतकऱ्यांना शेतीमालासह इतर साहित्य शेतात नेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या ठिकाणी पुलाची उभारणी करावी अशी मागणी दगडू उखर्डे, सोनाजी उखर्डे, शालिग्राम धनवई, अमोल देशमुख, शंकर उखर्डे, गणेश कावळे, मंजीराम बोराडे, मंजीराम उखर्डे, रामचंद्र भागवत, सांडू उखर्डे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. 

नदी ओलांडून जवळपास शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे लागते. दरम्यान, जीवरेखा नदीवर पूल नसल्याने गळ्याइतक्या पाण्यातून मार्ग काढत शेतात जावे लागते. खत व इतर साहित्य नेण्यासाठी हाच मार्ग असल्याने बैलगाडी नेणेही कसरतीचे ठरते. 
- रामचंद्र भागवत, शेतकरी 

सद्यःस्थितीत शेतातील मिरची तोडणीला आलेली आहे. वाहनाने तोडणी केलेले मिरची पोती नदीपात्राच्या एका काठावर आणून ठेवावी लागतात. नंतर पाठीवर एकेक पोते पात्रातून नेत दुसऱ्या काठावर ठेवावे लागते. यासाठी दोन्ही बाजूंना दोन वाहने ठेवावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड वाढत आहे. 
- बाळू उखर्डे, मिरची उत्पादक शेतकरी 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com