स्वस्त होतेय रस्त्यावरचे मरण!

अनिल जमधडे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रस्ता सुरक्षा समितीच्या नियमित बैठका होत असतात. पुरेशा उपाययोजना करण्यात येत आहेत. कालच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. या बैठकीत ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने बांधकाम विभागाने काय कामे केली, याची माहिती बांधकाम विभाग पुढच्या बैठकीत देणार आहे.  
- सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी

औरंगाबाद - जिल्ह्यात अपघात आणि अपघातांतील मृतांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहने आणि उपाययोजनांकडे दुर्लक्षच अपघातांना कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल ५१९ अपघातांत २६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील शंभर जणांचा मृत्यू हा शहर परिसरातील अपघातांत झालेला आहे. काही वर्षांपूर्वी वर्षभरात जिल्ह्यात दोनशेच्या जवळपास मृृत्यू होत, आता पाच महिन्यांतच हा आकडा दुप्पट झाल्याने अपघातांची चिंता वाढली आहे. मानवी चुका, वाहतुकीचे नियम न पाळणे ही अपघाताची मुख्य कारणे असली तरीही उपाययोजना हा अत्यंत महत्त्वाचा विषय दुर्लक्षित आहे.

रस्ता सुरक्षा समित्या नावापुरत्या 
अपघात रोखण्याच्या उपाययोजना करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आणि खासदारांच्या अध्यक्षतेखाली दुसरी रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे.

प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन समितीने उपाययोजना सुचवणे आणि सुचवलेल्या उपाययोजनांवर आरटीओ, पोलिस, बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ यांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र उपाययोजना कागदावरच आहेत. 

काय आहे अपेक्षा?
जिल्ह्यात तब्बल ८५ अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्‍चित करण्यात आली आहेत. कुठल्याही रस्त्यावर ५०० मीटर भागात मागील तीन वर्षांत पाच अपघात झाले, त्याचप्रमाणे पाच वर्षांत दहा व्यक्ती मृत्यू पावल्या, अशी अपघातग्रस्त ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ८५ ब्लॅक स्पॉट शोधून यादी तयार करण्यात आली आहे. रस्त्यातील तीव्र वळणे सरळ करणे, दिशादर्शक फलक लावणे, कॅट आय लावणे, साईड मार्किंग करणे, वळण मार्किंग करणे अशा विविध उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्ष काम करण्याऐवजी सध्या केवळ कागदोपत्री उपाययोजनांचे खेळ सुरू आहेत.

काही महत्त्वाचे ब्लॅक स्पॉट 
बीड बायपास रस्ता - रेणुकामाता कमान, मास्टर कूक हॉटेल, एमआयटी चौक, मुकुंदवाडी शिवाजी पुतळा जंक्‍शन, धूत हॉस्पिटल जंक्‍शन, विमानतळ जंक्‍शन, केंब्रिज शाळा जंक्‍शन, देवळाई चौक. 
वैजापूर रोड - हॉटस्पॉट ढाबा ते फौजी ढाबा.

नगर रोड : गोलवाडी फाटा, एएस क्‍लब, कामगार चौक, बजाज गेट, साई पेट्रोलपंप, लांझी टी पॉइंट, लिंबेजळगाव, जिकठाण फाटा, जिकठाण फाटा ते सुलतानपूर रस्ता, दहेगाव बंगला, ढोरेगाव-गंगापूर फाटा, भेंडाळा फाटा, नवीन कायगाव. 

सिल्लोड रोड : गोळेगाव फाटा, पानस किंवा दिग्रस, सावंगी फाटा, चौका घाट, गणोरी फाटा, पाल घाट, वानेगाव. 
औरंगाबाद-पैठण-शहागड रस्ता : आदित्य हॉटेलजवळील रस्ता, आखातवाडा फाटा. 
शेवगाव-पैठण रोड : सोनवाडी फाटा. 

बीड-पाचोड रस्ता : शुकलाना ढाबा, दाभरूळ. 
धुळे-कन्नड महामार्ग (राज्य महामार्ग क्र २११) : कागजीपुरा, नांदराबाद फाटा, औरंगाबाद नाका, वेरूळ घाट, पळसवाडी फाटा, गल्लेबोरगाव फाटा, हतनूर फाटा, पाणपोई फाटा, अंबाडी रस्ता, सिल्लेगाव. कसाबखेडा-वेरूळ-खुलताबाद-फुलंब्री (राज्य मार्ग क्र. २१६) गोलू ढाबा, सुलतानपूर बसस्टॅंड, काठशिवरी फाटा, माथेरान हॉटेल. 

शहरात अपघातांतील बळींनी ओलांडली शंभरी, दोनशेवर जखमी 
जिल्ह्यात पाच महिन्यांत २६७ मृत्युमुखी, पावणेचारशे जखमी
रस्ता सुरक्षा समित्यांच्या नुसत्याच बैठका, उपाययोजना शून्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Accident Care