रस्त्यावर कचरा दिसला तर अधिकाऱ्यांची खैर नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

औरंगाबाद - तब्बल ८४ दिवसांनंतरही कचराकोंडी फुटत नसल्याने आता अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यासाठी १६ मेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर शहरात रस्त्यावर कचरा आढळल्यास व १०० टक्के ओला- सुका असे वर्गीकरण झाले नाही तर वॉर्ड अधिकारी आणि नियंत्रण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय विभागीय समितीने घेतला.

अद्याप शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. विशेष म्हणजे काही वॉर्डांत ओला व सुका कचरा एकत्रच येत आहे. दरम्यान शुक्रवारपासून (ता. ११) चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी या चार ठिकाणी शहरात पडून असलेला कचरा हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. १५ तारखेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, १६ मेनंतर रस्त्यांवर कचरा दिसल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय विभागीय समितीने घेतला आहे. या संदर्भात गुरुवारी (ता. दहा) आदेश जारी करण्यात आले आहेत.

दोन जणांकडून दीड हजारांचा दंड वसूल
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेची कारवाई सुरूच आहे. गुरुवारी (ता. दहा) आणखी दोन जणांकडून दीड हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गारखेडा परिसरात रस्त्यावर कचरा टाकला म्हणून प्रवीण जैस्वाल यांच्याकडून एक हजार; तर फेरोज कुरेशी यांच्याकडून ५०० रुपये दंड वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्यासह स्वछता निरीक्षकांनी वसूल केला. तसेच गारखेडा परिसरात व जालना रोडवर हॉटेल मालक, मंगल कार्यालय चालकांना, शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: road garbage officer crime municipal