सावधान... दोन वर्षांनंतरही रस्त्यांची कामे सुरूच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सातारा-देवळाई परिसराचा विकास करण्याच्या नुसत्याच वल्गना सुरू आहेत. साडेआठ कोटींतून सहा रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्याचा निर्णय दोन-अडीच वर्षांपूर्वी झाला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियाही झाल्या; मात्र अद्याप रस्त्यांची कामे सुरूच आहेत. दरम्यान, या परिसरातील नागरिक सध्या चिखलामुळे त्रस्त आहेत. 

औरंगाबाद -सातारा-देवळाई परिसराचा विकास करण्याच्या नुसत्याच वल्गना सुरू आहेत. साडेआठ कोटींतून सहा रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्याचा निर्णय दोन-अडीच वर्षांपूर्वी झाला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियाही झाल्या; मात्र अद्याप रस्त्यांची कामे सुरूच आहेत. दरम्यान, या परिसरातील नागरिक सध्या चिखलामुळे त्रस्त आहेत. 

सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या भागाच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांपासून केवळ कागदोपत्री खेळ सुरू आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेजच्या डीपीआरचे पुढे काय झाले याचा शोध नागरिक घेत आहेत. एवढेच नव्हे तर मंजूर कामेदेखील पूर्ण होत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील विकास शुल्काचा साडेआठ कोटींचा निधी महापालिकेला सिडकोकडून मिळाला होता. त्यातून सहा रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्याचा निर्णय तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी घेतला होता. तुपे, त्यानंतर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपला. नंदकुमार घोडेले यांचे शेवटचे वर्ष सुरू आहे; मात्र रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले; मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कामे रखडली. दरम्यान, शुक्रवारी श्री. घोडेले यांनी रस्तेकामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते म्हणाले, की रेणुकामाता कमान ते चाटे
स्कूल या रस्त्याचे काम लवकर सुरू होईल. कमलनयन बजाज हॉस्पिटल ते सुधाकरनगर, हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांचे निवासस्थान, घराणा फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांचे निवासस्थान, साईनगर ते अशोकनगर या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असून, ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दुपटीने वाढला खर्च 
नाईकनगर ते विनायक पार्क या रस्त्याचा खर्च दुपटीने वाढला आहे. पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार होते. त्यानुसार एक कोटी 61 लाख रुपयाची निविदा प्रक्रिया झाली; मात्र आता या रस्त्याचे व्हाइट टॉपिंग करण्यासाठी तीन कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे नव्याने अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road work continued even after two years