दरोडा टाकणाऱ्यांना परभणीत मोक्का

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

शहरातील दत्तधाम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकून खून करणाऱ्या दरोडेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. शांतीवर कॉलनीतील ऋषीकेश वासुदेव चक्रवार यांच्या घरी 30 मे रोजी रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करून 15 तोळे दागिने, रोख पाच हजार रुपये, असा एकूण पाच लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला होता.

परभणी - शहरातील दत्तधाम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकून खून करणाऱ्या दरोडेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. शांतीवर कॉलनीतील ऋषीकेश वासुदेव चक्रवार यांच्या घरी 30 मे रोजी रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करून 15 तोळे दागिने, रोख पाच हजार रुपये, असा एकूण पाच लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला होता. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सविता वासुदेव चक्रवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या तपासात चेतन ऊर्फ मर्दा गिरीश ऊर्फ दगडू भोसले (रा. बोरुडी गायरान, गंगापूर, औरंगाबाद) याच्या टोळीने हा दरोडा घडवून आणल्याचे घटनेच्या दिवशीच निष्पन्न झाले. टोळीप्रमुख व टोळीतील सदस्य नितीन सोमनाथ शिंदे, सतीश बिस्किट्या पवार व त्याचे साथीदार कारेगाव शिवारात राहावण्यास आले होते. तितर पक्षी विकण्याचा आणि भीक मागण्याचा बहाणा करून दत्तधाम परिसराची टेहाळणी करून त्याने हा गुन्हा घडवून आणल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले होते. चेतन ऊर्फ मर्दा भोसले व टोळी सदस्य नितीन सोमनाथ शिंदे, सतीश बिस्किट्या पवार यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या चौकशीत चेतन याने त्याच्या टोळीसह परभणी, औरंगाबाद, लातूर जिल्ह्यांत चोरी, घरफोड्यांसह 14 गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले. नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांच्या शिफारशीसह नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी त्यास मंजुरी दिली, असे उपाध्याय यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robber Mokka Crime