लातूरात घरफोडी करणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

लातूर जिल्ह्यातील शिरूरताजबंद गावात घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रविवारी पुण्यात अटक केली.

लातूर - लातूर जिल्ह्यातील शिरूरताजबंद गावात घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रविवारी पुण्यात अटक केली. पाच दिवसांच्या आत पोलिसांनी या घरफोडीचा तपास लावला आहे.

राम दगडू गरगेवाड (वय २४, रा. मळवटी रस्ता, लातूर) आणि दादासाहेब दशरथ लावणे (वय ३३, रा. वडगाव चौक, आळंदी) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अहमदपूर तालुक्यातील शिरूरताजबंद गावात लक्ष्मण हरीदास मद्रे (वय ४०) यांचे घर चोरट्यांनी फोडले होते. हा प्रकार मंगळवारी (ता. १२) भरदिवसा घडला. घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. कपाटात ठेवलेले २२ हजार रूपये आणि चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, असा ७७ हजारांचा ऐवज त्यांनी लंपास केला होता. याबाबतची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली.

तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार घरफोडी झाल्यानंतर बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. ते लातूरमधून पुण्यात कोणत्या भागात गेले आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुधाकर मुरलीधर बावकर यांच्यासह सहकाऱ्यांना आरोपीच्या शोधाकरीता पाठवले. या वेळी लावणे आणि गरगेवाड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरवातीला दोघांनीही गुन्ह्याविषयी असमाधानकारक माहिती दिली; पण सखोल चौकशीनंतर दोघांनीही घरफोडी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

शाेधासाठी दाेन पथके रवाना -
पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाेनही चाेरट्यांनी शिरूरताजबंदमध्ये झालेल्या घरफाेडीची कबुली दिली आहे. यासाेबतच आणखी चार, पाच आराेपींनी मिळून लातूर जिल्हा तसेच इतर जिल्ह्यात घरफाेड्या केल्या आहेत, असे चाैकशी दरम्यान लावणे आणि गरगेवाड या दोघांनी पाेलिसांना सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील इतर काही गुन्हे उघड हाेण्याची शक्यता आहे. यासाठी उर्वरित आराेपींचा शाेध घेता यावा म्हणून पाेलिसांनी आणखी दाेन पथके तयार करून शाेधासाठी पाठवली आहेत. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: robbers are arrested in Pune