अंबड तालुक्यात दरोडा; सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर चोरट्याने मारला डल्ला

बाबासाहेब गोंटे
Friday, 11 December 2020

अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथे अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता.११) भल्या पहाटे धुमाकूळ घालत घरावर दरोडा टाकत सोन्या, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळुन ६९ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथे अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता.११) भल्या पहाटे धुमाकूळ घालत घरावर दरोडा टाकत सोन्या, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळुन ६९ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव येथील कारभारी गोविंदसिंग बायस (वय ६५) या शेतकऱ्याच्या वाड्यात शुक्रवारी (ता.११) भल्या पहाटे पावणे तीन वाजेच्या दरम्यान सात ते आठ अज्ञात चोरट्याने भिंतीवरून वाड्यात प्रवेश केला. घरमालक कारभारी बायस यांच्याकडे असलेला मोबाईल बंद करून बाहेरील संपर्क तोडण्यात आला.

त्यानंतर बायस यांच्या हातातील कुऱ्हाड चोरट्याने हातात घेऊन जबरीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर घरात असलेल्या लोखंडी पेटीतील व कारभारी बायस यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्या,चांदीचे दागिने यामध्ये दोन सोन्याचे कानातील फुल, एक मनिमंगलसूत्र, सोन्याचे चार ग्राम मनी, चांदीच्या दोन पाटल्या, दोन कंकण वीस भाराचे तसेच रोख २१ हजार रुपये मिळून एकूण ६९ हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला आहे.

पोलिस अधीक्षकांचे पथक दाखल
अंबड तालुक्यतील सोनकपिंपळगाव येथील शेतकरी कारभारी बायस यांच्या घरावर शुक्रवारी भल्या पहाटे चोरट्याने दरोडा टाकून मारहाण करत जखमी केल्याची घटना माहिती होताच जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, गोंदीचे वारे, पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक सुग्रीव चाटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण, महेंद्र गायके तसेच जालना येथून चोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट यांना पाचारण करण्यात आले होते.

जखमी कारभारी बायस यांना उपचारासाठी अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery In Ambad Taluka, Gold, Silver Stolen