औरंगाबाद शहरात चोरांचा हैदोस 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - शहरात घरफोडीच्या घटनांत वाढ होत असून, निवृत्त अधिकारी, डॉक्‍टरचे घर चोरांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोर एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी विशेष पोलिस अधिकाऱ्याची (पोलिस मित्र) बिअर शॉपी व एका ठेकेदाराचेही घर फोडले. या घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 19) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
पेठेनगरात बंद घर फोडले 

डॉ. कुलदीप सखाराम वाकपांजर (रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) हे कुटुंबासह 16 ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास अकोला येथे गेले होते. त्यांचे फाटक व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर बारा हजारांचे कानातील झुंबर, कर्णफुले, दहा ग्रॅमची सोनसाखळी, एक ग्रॅमचे पॅंडल, मणी मंगळसूत्र, चांदीचे दोन शिक्के व एक चांदीची पैंजण त्यांनी लंपास केली. रविवारी (ता. 18) सायंकाळी साडेपाचला वाकपांजर घरी आले त्यावेळी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
कंत्राटदाराच्या घरातून दागिने लंपास 
बांधकाम ठेकेदाराची आई बाथरूममध्ये असताना बाहेरून कडी लावत एकीने दागिन्यांसह रक्कम लंपास केली. ही घटना आठ ऑगस्टला दिवसा घडली. आकाश किशोर गायकवाड (रा. फ्रेंडस्‌ कॉलनी, कोकणवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या आई सकाळी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. त्यावेळी एका महिलेने चार पोती, दोन ग्रॅमचे सेवनपीस, तीन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक ग्रॅमची नथ, तीन ग्रॅमचे पॅंडल, चार ग्रॅमचे कानातील रिंग व पाच हजारांची रक्कम लंपास केली. 
 
निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले 
निवृत्त अधिकारी सुहास भीमराव मुंगीकर (रा. पेन्शनपुरा, क्रांती चौक पोलिस ठाणे रोड) यांचे घर फोडून चोराने दागिने व पाच हजारांची रक्कम लंपास केली. मुंगीकर घराला कुलूप लावून रविवारी सायंकाळी सहा ते रात्री आठच्या सुमारास बाहेर गेले होते. चोराने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन तोळ्यांचे चांदीचे अभिषेक पात्र, चांदीची अंगठी, एक ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच हजारांचा मोबाईल व चौदाशे रुपये लंपास केले. 
 
पोलिस मित्राची बिअर शॉपी फोडली 
विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत भाऊराव गोर्डे पाटील (रा. संग्रामनगर) यांची बिअर शॉपी फोडून चोराने ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (ता. 20) उघडकीस आली. सोमवारी विधानसभा निवडणुकीमुळे सायंकाळपर्यंत मद्यविक्रीला बंदी होती. त्यामुळे गोर्डे यांची बिअर शॉपी बंद होती. ही संधी साधून चोरांनी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शॉपीच्या गेटजवळील ग्रील उचकटली. आत शिरून चोरांनी गल्ल्यातील पाच ते सहा हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यावर गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी फुटेजही जप्त केले. फुटेजनुसार अमोल वैजनाथ गलाटे (रा. इंदिरानगर) याच्याविरुद्ध गोर्डे यांनी तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com