शेकापूरात चार लाखाची घरफोडी; कंधार ठाण्यात गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 27 मे 2019

एका परिवाराच्या घरी शेकापूर (ता. कंधार) येथे अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख असा 4 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (ता. 26) रात्री घडली. 
 

नांदेड : शहरासह ग्रामिण भागात प्रचंड तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. दिवसा व रात्री अंगाची लाही- लाही होत असल्याने ग्रामिण भागात घर बंद करून उकाड्यापासून बचाव व्हावा, म्हणून छतावर झोपण्यासाठी जातात. अशाच एका परिवाराच्या घरी शेकापूर (ता. कंधार) येथे अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख असा 4 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (ता. 26) रात्री घडली. 

शेकापूर (ता. कंधार) येथील विनायकराव मोरताडे हे आपल्या परिवारासह राहतात. वाढत्या तापमानामुळे दिवसभर हैराण असलेले मोरताडे यांचे कुटूंबीय रात्रीचे भोजन करून उकाड्यापासून बचाव व्हावा म्हणून छतावर झोपण्यासाठी गेले. अज्ञात चोरट्यांनी मोरताडे कुटुंबीय गाढ झोपेत असतांना घराच्या पाठीमागून वर चढून मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील वीस तोळे वजनाचे चांदीचे दागिणे, सोन्याचे दागिणे व रोख अडीच लाख रुपये असा चार लाख 10 हजाराचा ऐवज लंपास केला. ही बाब सोमवारी (ता. 27) सकाळी त्यांच्या लक्षात आली. लगेच त्यांनी कंधार पोलिस ठाण्यात जाऊन चोरी झाल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी आपल्या पथकासह त्या ठिकाणी जावून पहाणी केली. परंतु चोरांचा त्यांना कुठलाच माग दिसून आला नाही. पंचनामा करून मयुर मोरताडे याच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार श्री. कराळे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in nanded A case has been registered in Kandhar Thane