'साई एक्स्प्रेस'वर दरोडा

Robbery
Robbery

औरंगाबाद - शिर्डी ते काकीनाडा ‘साईनगर एक्‍स्प्रेस’ अडवून दरोडेखोरांनी प्रवाशांना बेदम मारहाण करीत महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २०) रात्री ८.३० च्या सुमारास नगरसूल ते अंकाई स्थानकादरम्यान घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या असून, काही संशयितांना प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. दरम्यान, रेल्वेला सुरक्षा का नाही, असा जाब विचारत प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रात्री ११.४२ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. 

आंध्रप्रदेशातील शेकडो भाविक शिर्डी-काकीनाडा साईनगर एक्‍स्प्रेसने शिर्डीला दर्शनासाठी येतात. त्यात महिलांची संख्या मोठी असते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ८.२० वाजता साईनगर एक्‍स्प्रेस (क्रमांक १७२०५) मनमाडवरून औरंगाबादकडे निघाली होती. मनमाड ते अंकाईदरम्यान जंगलात चेन ओढून रेल्वे थांबविण्यात आली. कर्मचारी खाली उतरून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक जंगलातून रेल्वेवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

सर्वत्र अंधार असल्याने एकच खळबळ उडाली. सात ते आठजण बोगी क्रमांक तीन, चार, पाच, सहा व आठमध्ये चढले. त्यांनी महिलांना मारहाण करीत सोन्याचे दागिने हिसकावण्यास सुरवात केली. काही महिलांनी आरडाओरड केल्यानंतर इतर प्रवासी मदतीसाठी धावून आले; मात्र त्यांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली. दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत दिसेल त्या महिलेचे दागिने धमकावून, मारहाण करून ओरबाडून घेण्यात आले. त्यानंतर या दरोडेखोरांनी रेल्वेतून उड्या मारून पलायन केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. या प्रकारानंतर रेल्वे नगरसूल स्टेशनवर आली त्या वेळी प्रवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुरक्षेसाठी पोलिस नसल्याचा प्रवाशांचा आरोप होता. रेल्वेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय वाघ यांनी प्रवाशांची तक्रार नोंदवून घेतली; मात्र उपचाराची सोय नसल्याने ही रेल्वे औरंगाबादला पाठविण्यात आली. या ठिकाणी जखमी महिलांवर उपचार केल्यानंतर रेल्वे ११.४२ वाजता काकीनाडासाठी रवाना झाली.

सहा जणांची कसून चौकशी 
रेल्वे मनमाडहून निघाली तेव्हापासून काही जण महिलांना लुटण्याचा प्रयत्न करीत होते, असे काही प्रवाशांचे म्हणणे होते. काही प्रवाशांनी सात ते आठ जणांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. या संशयितांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. हा गुन्हा मनमाड पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे. 

औरंगाबादेत खबरदारी
साईनगर एक्‍स्प्रेसवरील दरोड्याच्या घटनेनंतर औरंगाबाद रेल्वेस्थानकावर खबरदारी म्हणून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेल्वेमधील पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू होते.

सोन्याच्या साखळ्या, दागिने हिसकावले 
दरोडेखोरांनी महिलांना टार्गेट करीत त्यांच्या सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्र, अंगठ्या असा सात ते आठ लाखांचा ऐवज लुटल्याचा लोहमार्ग पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com