लघुशंका करणं पडलं महागात; दोनशे रुपयांचा बसला दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

लाल परीच्या प्रगतीची गाथा सांगणाऱ्या फिरत्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मध्यवर्ती बस स्थानकात फेरफटका मारला. यावेळी त्यांना एक तरूण उघड्यावर लघुशंका करताना दिसला.

लातूर : बसस्थानक आवारात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या तरुणास थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच दंड ठोठावण्याची घटना आज (गुरुवार) येथे घडली. सुलभ शौचालय असताना उघड्यावर लघुशंका केल्याबद्दल संबंधित तरुणाला दंड करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  

लाल परीच्या प्रगतीची गाथा सांगणाऱ्या फिरत्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मध्यवर्ती बस स्थानकात फेरफटका मारला. यावेळी त्यांना एक तरूण उघड्यावर लघुशंका करताना दिसला. सुलभ शौचालय असताना उघड्यावर लघुशंका का केली, इथे झालेली दुर्गंधी आता साफ करून देणार का, असे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला विचारल्यानंतर ‘मी पुन्हा असे करणार नाही’, असे उत्तर त्या तरूणाने दिले. ‘तुम्ही लघुशंका इथे पुन्हा करणार नाही, हे पाहायला मी पुन्हा यायचं का?’ या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रश्नावर मात्र तो तरुण निरूत्तर झाला. अखेर त्याला दोनशे रुपयांचा दंड ठोठावून सोडून देण्यात आले.

तुम्ही अशिक्षित आहात का, शिक्षण काय झाले आहे? असे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणास विचारले. माझे जवळच दुकान असून मी इथे आलो होतो, असे उत्तर दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:चे दुकान सोडून इथे दुर्गंधी का केली. आता स्वच्छता करून देणार का, असे उलट प्रश्न विचारले. गोंधळलेल्या तरुणास काही वेळाने त्याला दंड ठोठावून जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा एसटी बसस्थानकाकडे वळवला. 

एसटी बस सेवेत आजवर झालेले बदल लोकांसमोर आणण्यासाठी फिरते प्रदर्शन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. श्रीकांत यांच्या हस्ते आज (गुरूवार) करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी बस स्थानकाची पाहणी करायला सुरवात केली. बसस्थानक परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात आहे का, भिंतींना रंगरंगोटी, बस स्थानकातील खड्डे या गोष्टींकडे त्यांनी लक्ष्य वेधले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 200 fine to youth for toilet reason in Bus Station premises