राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कॅन्सरसारखा पसरतोय- अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

संघ, भाजप, शिवसेनेसोबत मुकाबला करून सामान्य माणसाला चांगले दिवस आणण्यासाठी काँग्रेसची सत्ता आणावीच लागेल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

औरंगाबाद- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कॅन्सरसारखा पसरत चालला असून, मनुवादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 21) केली. संघ, भाजप, शिवसेनेसोबत मुकाबला करून सामान्य माणसाला चांगले दिवस आणण्यासाठी काँग्रेसची सत्ता आणावीच लागेल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

काँग्रेसच्या बूथ सदस्यांचा गुरुवारी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी खासदार तुकाराम रेंगे, भीमराव डोंगरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार नितीन पाटील, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, भाऊसाहेब ठोंबरे, महिला शहराध्यक्ष सरोज मसलगे, सुरेखा मानखडे, बाबा तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
चव्हाण म्हणाले, ""राज्यात 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅंकेवर मोर्चा काढावा'', अशा सूचना त्यांनी केल्या. ऍड. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. सरोज मसलगे यांनी आभार मानले. 

समविचारी पक्षांची मोट 
भाजपला संपविण्यासाठी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून, समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी झाली आहे. इतर पक्षांसोबतही लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. 

राहुल गांधी थेट बोलतात... 
गावपातळीपर्यंत बूथ रचना मजबूत करण्याची सूचना राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे घरी बसून बोगस कामे करू नका. त्यांना वाटेल तेव्हा कोणालाही फोन लावतात, असा इशारा कामचुकार पदाधिकाऱ्यांना या वेळी देण्यात आला. 

'नवरदेव' कोणीही असो, तुम्ही काम करा 
निवडणुकीत पक्ष कोणालाही उमेदवारी देईल, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे. तुमच्यामुळेच आम्ही व्यासपीठावर आहोत. संघटना मजबूत असेल तरच उमेदवार निवडून येतो, अन्यथा देवाच्या भरवशावर काम करावे लागेल असा इशारा चव्हाण यांनी दिला.

Web Title: rss spreading as cancer says ashok chavan