‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

संदीप लांडगे
गुरुवार, 6 जून 2019

अशी आहे स्थिती
राज्यातील आरटीई रिक्त जागा - १,१६,७९३
पहिली फेरी सोडत - ६७,७१६
पहिल्या फेरीत प्रवेश निश्‍चित - ४७,०३५
पहिल्या फेरीत प्रवेश न झालेले - २०,६८१
प्रतीक्षेत असलेले प्रवेश - ४९,०७७

औरंगाबाद - बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशासाठीच्या अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी पालकांना पुन्हा सात जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच फेरीची प्रक्रिया एक महिना चालल्याने दुसऱ्या फेरीची वाट पाहणाऱ्या पालकांत आपल्या पाल्याच्या प्रवेशाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार १९५ शाळांमधील एक लाख १६ हजार ७९३ जागांसाठी दोन लाख ४४ हजार ३५२ अर्ज दाखल झाले. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ८ एप्रिलला ६७ हजार ७१६ जागांसाठी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. आतापर्यंत या फेरीतील ४७ हजार ३५ प्रवेश निश्‍चित झाले आहेत. २० हजार ६८१ प्रवेश अद्याप बाकी आहेत.

अनेक अर्जांत चुका व गुगल लोकशन चुकीचे नोंदविल्याचे प्रवेशात अडचणी आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यापूर्वी पालकांना अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 

दुसऱ्या, तिसऱ्या फेरीसाठी अजून ४९ हजार ७७ प्रवेश प्रतीक्षेत आहेत. पहिलीच फेरी एक महिना सुरू होती. १७ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यास आता फक्त दहा दिवस उरले आहेत. या काळात ४९ हजार ७७ प्रवेश कधी होणार, पाल्याला प्रवेश मिळणार की नाही, पुढील फेऱ्यांत तांत्रिक अडचणी आल्या तर पुन्हा मुदतवाढ मिळणार का, तोपपर्यंत मुलांना कुठल्या शाळेत बसवावे आदी विचारांनी पालकांची झोप उडाली आहे. शाळा सुरू होण्याआधीच ही प्रक्रिया संपवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE Admission Process Education