साहेब, चूक झाली; पण घाई होती हो!

RTO
RTO

औरंगाबाद - रस्ता वाहतूक सुरक्षा अभियानात थेट कारवाईऐवजी वाहनधारकांना नियम समजाविण्याचे काम पोलिस करीत आहेत; मात्र कारवाईचा बडगा कमी झाल्याने, ग्रामीण पोलिसांना चित्रविचित्र अनुभव येत आहेत. प्रतिप्रश्‍न करीत आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत काही वाहनधारक बोलतात; मात्र दरडावल्यानंतर ते गुपचूप निघून जातात. आम्ही सौम्य शब्दांत सांगूच नये का, असा प्रश्‍न यानिमित्ताने काही पोलिसांना पडला आहे.

सध्या देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने पोलिस आणि आरटीओ कार्यालयांमार्फत वाहतूक नियमांच्या प्रबोधनावर भर दिला जात आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिस सध्या वाहनधारकांना नियम समजावून सांगण्याच्या कामात गुंतले आहेत. असे असले तरीही जरब कमी केली की काय होते, याचा अनुभवही पोलिस घेत आहेत.

महामार्ग पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलिस दुचाकीस्वारांना थांबवून वाहतुकीचे नियम समजावून सांगत आहेत. 
हेल्मेट नसलेल्यांना हेल्मेट का घातले पाहिजे, सीटबेल्ट न लावणाऱ्याला सीटबेल्ट का लावला पाहिजे, अशा प्रकारे वाहनधारकांचे प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत; मात्र कारवाई हे केवळ शिकविणे असल्याचा समज झालेले महाभाग समजून घेण्याऐवजी उलट प्रतिप्रश्‍न करीत असल्याचा अनुभव येत आहे.

काय होतेय गडबड?
  उशिरा निघणे आणि वेगाने जाणे 
  मी गाडी सुरक्षित चालवतो म्हणत हेल्मेट न घालणे
  सीटबेल्ट न लावताच वाहने चालविणे 
  वेगाने वाहन चालविणे 
  ट्रीपलशीट चालविणे, मुलांना पेट्रोल टाकीवर बसविणे 

काय आहेत प्रश्‍न? 
  आम्हाला वाहतुकीचे नियम माहीत आहेत  
  ग्रामीण भागात कुठे हेल्मेट सक्ती आहे? 
  उशीर झाला म्हणून हेल्मेट विसरले, विसरलो
  घाईत आहे, अंत्ययात्रेला निघालो आहे 
  सगळ्यांवर सारखीच कारवाई करा
  आम्हाला पकडले, त्यांना कसे सोडले?

वाहनधारकांना अतिघाई महागात पडत आहे. अतिवेगाने वाहन चालविल्याने; तसेच हेल्मेट न वापरल्याने जीवितहानीची शक्‍यता वाढते. वाहनधारकांना नियम सांगतानाही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.
- नामदेव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com