वाहन परवान्यावर जुनाट फोटो राहणार कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

वाहन परवान्यासाठी असलेले फोटो बदल करण्याची सोय एनआयसीकडून बंद करण्यात आली आहे. काही फसवणुकीचे प्रकार उघड झाल्याने सध्यातरी फोटो अपडेट बंद आहे. मात्र एखाद्या प्रकरणात फोटो बदलण्यासाठी एनआयसीला कळवून ही सोय सुरू करून घेता येते.
- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयातून मिळणाऱ्या वाहन परवान्यावरील फोटो अपडेट बंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत फसवणुकीचे प्रकार समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वाहन चालवण्यासाठी आरटीओ कार्यालयातून वाहन परवाना मिळवावा लागतो. प्रत्येक वाहन चालवण्याचा परवाना स्वतंत्र असतो. एकापेक्षा अधिक वाहन चालवण्याचा परवाना असला तर तो एकाच परवान्यावर नोंद करून मिळतो. वाहन परवाना काढण्यासाठी संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया पार पाडावी लागते. वाहन परवाना काढल्यानंतर पत्ता बदल, नावात बदल, फोटो बदल, परवन्यात वाढ करणे अशी सोयही ऑनलाइन पद्धतीने करून घेता येतात. 

परवान्याची मुदत ही पंधरा ते वीस वर्षांपर्यंत असल्याने जुना झालेला फोटोही नव्याने काढण्याची सोय होती. एखाद्या व्यक्तीने वयाच्या अठराव्या वर्षी वाहन परवाना काढला आणि त्याला दहा वर्षे उलटून गेले, तर चेहऱ्यामध्ये मोठा बदल होतो. त्यामुळे फोटो अपडेट करण्याची सोय महत्त्वाची होती. 

फोटो बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कार्यालयात जाऊन नवीन फोटो काढून घेता 

येत होता. मात्र फोटो बदलण्याच्या सुविधेमुळे राज्यात काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार लक्षात आले. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेसाठी असलेल्या एनआयसी या हैदराबाद येथील यंत्रणेकडून फोटो अपडेट ही सुविधाच बंद 
करण्यात आली आहे. 

फोटो अपडेट करण्याची सोय बंद केल्याने सध्यातरी वाहनधारकांना वाहन परवान्यावर जुनाट फोटो ठेवण्याशिवाय सध्या पर्याय नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO License Old Photo