निम्मे सुरू, निम्मे बंद!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

रविवारी आरबीआयचे आदेश आल्यानंतर 197 पैकी 42 कोटी वैजापूर (एसबीएच), 22 कोटी पैठण (एसबीआय) आणि पैठण (एसबीएच)ला 22 कोटी असे एकूण 86 कोटी रुपये देण्यात आले.

औरंगाबाद : साप्ताहिक सुटीमुळे बॅंका बंद असल्यामुळे रोख मिळविण्यासाठी खातेधारकांची संपूर्ण भिस्त एटीएमवर होती. मात्र, निम्मे एटीएम सुरू, निम्मे बंद अशी स्थिती रविवारी (ता. 20) शहरात बघायला मिळाली. तरीसुद्धा एटीएमनेच गरज भागविल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासाही मिळाला. आज बॅंका उघडण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून शनिवारपर्यंत एटीएमची अघोषित बंदी होती. तब्बल दहा दिवस 99 टक्‍क्‍यांच्या आसपास एटीएम बंद होते. यादरम्यान एटीएमसंदर्भात काम करणाऱ्या सहा एजन्सीजकडून एटीएम मशीन अपग्रेड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे निम्मे एटीएम अपग्रेड झाल्याने शनिवारी बहुतांश एटीएममधून 2000च्या नोटा एटीएमधारकांना मिळाल्या. त्यामुळे बॅंकांवरील अतिरिक्‍त ताणसुद्धा कमी झाला. रविवारपर्यंत खासगी व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे मिळून चारशेच्या आसपास एटीएम सुरू झाले होते. त्यामुळे रविवारी काही एटीएमवर पैसे असूनदेखील गर्दी नव्हती. पण सिडको, टीव्ही सेंटर, उस्मानपुरा आणि औरंगपुऱ्यातील एटीएमवर सातत्याने रांगा बघायला मिळाल्या.

197 पैकी 86 कोटींचे वाटप
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अमरप्रीत शाखेत गुरुवारी (ता. 17) 197 कोटी रुपये रिझर्व्ह बॅंकेकडून पाठविण्यात आले होते. मात्र, हे पैसे कोणत्या बॅंकेला किती द्यावयाचे, याचे निर्देश नसल्याने ते पैसे शनिवारपर्यंत पडून होते. रविवारी आरबीआयचे आदेश आल्यानंतर 197 पैकी 42 कोटी वैजापूर (एसबीएच), 22 कोटी पैठण (एसबीआय) आणि पैठण (एसबीएच)ला 22 कोटी असे एकूण 86 कोटी रुपये देण्यात आले. उर्वरित पैसे एसबीएचकडेच असून पुढील निर्देशानुसार हे पैसे वितरित केले जातील, असे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विक्रीकर विभागात बॅंकेचे स्वतंत्र काउंटर
विक्रीकर, थकीत कर आणि दंड अदा करण्यासाठी हजार-पाचशे रुपये विक्रीकर विभागातर्फे स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी युनियन बॅंक ऑफ इंडियातर्फे रेल्वेस्टेशनवरील विक्रीकर विभागात बॅंकेचे स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात येणार आहे. विक्रीकर भरण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी तीनपर्यंत हे काउंटर व्यापाऱ्यांकरिता खुले राहणार आहे. याचा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रीकर विभागाचे सहआयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी केले आहे.

Web Title: rush at atms for cash