८० व्या वर्षांत सुरू आहे ताम्रपट, शिलालेखांचा अभ्यास

लातूर - इतिहास संशोधक सु. ग. जोशी यांच्या घरातील एक खोली ही केवळ पुस्तकांची आहे. या खोलीतील पुस्तकांच्या गराड्यात बसून लेखन-संशोधनात रमलेले जोशी.
लातूर - इतिहास संशोधक सु. ग. जोशी यांच्या घरातील एक खोली ही केवळ पुस्तकांची आहे. या खोलीतील पुस्तकांच्या गराड्यात बसून लेखन-संशोधनात रमलेले जोशी.

लातूर - वयाच्या ऐंशीव्या वर्षांत अनेकजण निवृत्तीचे आयुष्य जगतात; पण एक ज्ञानतपस्वी आपले वय बाजूला ठेवून ताम्रपट, शिलालेख, पोथ्यांच्या अभ्यासात रमले आहेत. त्यातून ते प्राचीन भाषा, लिपी, त्यात दडलेला इतिहास हे भारतीय संस्कृतीतील वैभव उलगडून पाहत आहेत. त्यासाठी न थकता ठिकठिकाणच्या ग्रंथालयांत जाऊन ते संदर्भही गोळा करीत आहेत. तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. हे ज्ञानतपस्वी म्हणजे इतिहास संशोधक सु. ग. जोशी.

इतिहास संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना गुरू मानून इतिहास संशोधनात रमलेले जोशी यांचे आजवर अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. नुकताच ‘बीड जिल्ह्याचा इतिहास : संस्कृती आणि कोरीव लेख’ हा त्यांचा ग्रंथ वाचकांसमोर आला असून, असाच ग्रंथ लातूर जिल्ह्यावरही तयार होत आहे.

तो पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहासही ते ग्रंथातून उलगडणार आहेत. त्यासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालय येथे सतत जाऊन जुने संदर्भ गोळा केले आहेत.

या धडपडीबद्दल ‘सकाळ’शी बोलताना जोशी म्हणाले, की प्राचीन इतिहासाची आवड असल्यामुळे तरुणपणापासून या विषयाचे वाचन, लेखन करीत आलो. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन ताम्रपट, शिलालेख, पोथ्या गोळा करणे, त्याचे वाचन-संशोधन करणे हा छंद लागला. त्यातून वेगवेगळे ग्रंथ आकाराला आले. मराठवाडा संशोधन मंडळ या नावाची संस्थाही सुरू केली. या माध्यमातूनही विपुल संशोधनही झाले आहे. प्राचीन इतिहासाचा अभ्यास झाला तर अनेक गोष्टी पुढे येतात; पण त्यासाठी प्राचीन भाषा, लिपी आली पाहिजे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी अभ्यासकांमध्ये असायला हवी.

लातूर जिल्ह्याचा इतिहास या ग्रंथाबद्दल ते म्हणाले, की लातूर जिल्ह्यात ३२ शिलालेख आणि ताम्रपट प्राप्त झाले. ते संस्कृत, मराठी आणि कन्नड भाषेत असून ते ५९९ ते १७९१ या काळातील आहेत. याशिवाय, धर्मशास्त्रावर आधारित पाचशे वर्षांपूर्वीच्या पोथ्याही मिळाल्या. हा आपला अनमोल ठेवा आहे. यातून लातूर जिल्ह्याची प्राचीन परंपरा, इतिहास, संस्कृती, मराठीचे वैभव समोर येत आहे. या वैभवातून त्याकाळचे समाजजीवनही आपल्यासमोर येत आहे. ते लवकरच पुस्तकरूपाने वाचायला मिळेल. मांजरा या शब्दाची नोंद इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून प्राप्त होते. अहमदपूरचे प्राचीन नाव राजूर, तर चाकूरचे प्राचीन नाव चक्रपूर असे आहे. नवकुंडाच्या झरीला दोन कुंड दिसत असले तर प्राचीन काळी नऊ होते... अशा बाबींसह खरोसीकल्प कसे तयार झाले, उदगीर नाव का पडले, जिल्ह्यात २१ गावांना चिंचोली आणि सहा गावांना शिवणी नाव का पडले हेही या ग्रंथानिमित्ताने समजेल.

महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन मोडी ताम्रपट अहमदपूरमधील चोबळी येथे प्राप्त झाला. याचा काळ १३८० असा आहे. यावरून या परिसराची प्राचीनता कळते. पापनाश मंदिरातील शिलालेख इसवी सन ११२८चा असून, यासोबत मिळालेला सिद्धेश्‍वर मंदिरातील शिलालेख समकालीन आहे. यात लातूरचा उल्लेख, इतर ग्रामनाम पुढे आले आहेत.
- सु. ग. जोशी, इतिहास संशोधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com