प्रवेशाची 'सार' प्रणाली अखेर बंद

admissions
admissions

लातूर : वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या करीता शासनाने या वर्षी `सेतू अस्टीटंट अॅडमिशन रजिस्टर` (सार) ही प्रणाली सुरु केली होती. पण प्रणालीने प्रवेशात गोंधळ उडवून टाकला. अखेर ही प्रणाली बंद करण्याची नामुष्कीची वेळ राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षावर आली आहे. तसेच आदेशही शुक्रवारी (ता. 21) काढण्यात आले आहेत. आता ता. २४ जूनपासून नव्याने प्रक्रिया केली जाणार आहे. पण गेल्या चौदा पंधरा दिवसात सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. त्यांची मेहनत वाया गेली असून आता पुन्हा नव्याने त्यांना ऑनलाईन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्यादाच `सार`ही प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता. पहिल्या दिवसापासून या प्रणालीत गोंधळ उडत होतात. `सकाळ`ने सातत्याने हा विषय मांडला होता. पालक आणि विद्यार्थ्याच्या तक्रारीही वाढत होत्या. यातून सुरु असलेली प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी रात्री स्थगिती देण्यात आली होती.

उशिरा सूचलेले शहाणपण
गेल्या चौदा पंधरा दिवसापासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवार (ता. २१) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. रोज गोंधळ उडत आहे. तक्रारी वाढत आहे. या करीता सीईटी सेलने एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. या समितीला प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे गुरुवारी कळाले. हे उशिरा सूचलेले शहानपण ठरले. यातून आता नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे.

दोन लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया
प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून दोन लाख विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. याकरीता त्यांना अनेक अडचणीला
सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे तर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे. त्यांच्या अर्ज नोंदणी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा ता. २४ पासून नव्याने सुरु होणाऱया प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावेच लागणार आहे. पुन्हा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

प्रवेश शुल्क मिळणार का?
दोन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करताना प्रत्येकी ४२ रुपये शुल्कही भरले आहे. त्याची रक्कम ८५ लाखाच्या घरात जाते. ही रक्कम कशी परत मिळणार हा प्रश्नच आहे. विद्यार्थ्याना नव्याने शुल्क भरावेच लागणार आहे.सीईटी सेलच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या स्थगितीसंदर्भातील जाहिर सूचनेत अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हीत रक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल असा उल्लेख आहे. हे हित कसे रक्षण केले जाणार हा प्रश्न आहे.

`सार` या प्रणालीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. हे लक्षात घेवून ही सार प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. यात ता. २४ ते ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ता. २५ जूनपासून कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. शासनाकडून अद्याप वैद्यकीय अभ्यासक्रमाची नियमावली आलेली नाही. त्यामुळे सध्या अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमासाठी ही प्रक्रिया असणार आहे. या पूर्वी शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे ते शुल्क परत करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. माणिक गुरसळ, आयुक्त तथा सक्षम अधिकारी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com