कृषिमंत्री खोत यांनी चाड्यावर हात ठेवत केली पेरणी 

Sadabhau khot works at Farm
Sadabhau khot works at Farm

नांदेड : मंत्री म्हटले की मग लाल दिव्याची गाडी आणि सोबत इतर गाड्यांचा ताफा आलाच. त्याचबरोबर अधिकारी आणि कार्यकर्तेही सोबत आलेच. मात्र, असे असले तरी आपण ज्या संस्कृती आणि परंपरेतून आलो त्याची नाळ कधीच तुटत नाही. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात सोमवारी दुपारी घडली.

राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना एका शेतात शेतकरी पेरणी करताना दिसला. मग काय सदाभाऊंच्या मधला शेतकरी जागा झाला आणि त्यांनी गाडी थांबविली आणि कोणालाही कळायच्या आधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी देखील शेतकऱ्यासोबत चाड्यावर हात ठेवत केली पेरणी करायला सुरुवात केली. क्षणभर शेतकऱ्यालाही काही कळेना. जेव्हा चक्क कृषिमंत्रीच आपल्या सोबत पेरणी करतोय म्हटल्यावर त्याचा आनंद देखील गगनात मावेना. 

तब्बल एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नुकसानग्रस्त नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पिकांची पाहणी करुन सोमवारी (ता. 4) नरसीमार्गे बिलोली तालुक्यात जात होते. त्यावेळी लोहगाव शिवारात मंत्री महोदयाच्या गाड्याचा ताफा आला असता, रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात एक शेतकरी रब्बीची पेरणी करत होता. जन्मतःच काळ्या आईशी घट्ट नाळ असलेला हा गडी चळवळी अगोदरच्या दिवसाच्या आठवणीत जात चालत्या गाड्यांचा ताफा थांबवून सोबतच्या लोकांच्या लक्षात येण्याच्या आत थेट शेतातील औत गाठत शेतकऱ्यांच्या ओटीतील धान्य घेऊन चाड्यावर (पाबरीवर) हात ठेवत पेरणी करत मुठीतलं धान्य काळ्या आईच्या कुशीत मोकळे करत जुन्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राजेश पवार, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडूरंग शिंदे, तहसीलदार सुरेखा नांदे, जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार, माणिक लोहगावे व इतर पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचं काळ्या आईशी असलेलं दृढ नातं कुणाला माहीत नाही.....? रात्रंदिवस स्वतः शेतीत अपार कष्ट करत आपल्या शेतीच्या तुकड्यात काबाडकष्ट करत माणिक मोती पिकवायचा प्रयत्न आयुष्यातील तब्बल पन्नास वर्षे केला. दुग्ध व्यवसायासारखा शेतीला जोडधंदाही केला. पुढे शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना ते रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात वेळोवेळी रस्त्यावर उतरून मातीत राबणा-या हातांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, हे कोणी ही विसरू शकणार नाही.

ओल्या दुष्काळाने उध्वस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी काढलेल्या दुष्काळी दौ-यात सदाभाऊनी अचानकपणे शेतात जाऊन पेरणी करायला सुरुवात केल्याने उपस्थितांना सुखद धक्का बसला.

"मी मंत्री होऊन तीन वर्ष झाली असली तरी त्या अगोदरची ४९ वर्षे मी शेतात राबलोय. हे संकटाचे दिवस निघून जाऊन या राज्यातला शेतकरी नव्या दमानं, नव्या जोमाने पुन्हा उभं राहून आपल्या चिल्यापिल्यांची काळजी घेईल, असा आशावाद आहे.’’
- सदाभाऊ खोत, कृषिमंत्री. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com