सेफ्टी ऑडिटपूर्वीच घेतला पुलाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - फाजलपुऱ्याचा पूल आणि नहरीचे नळ तोडल्याप्रकरणी महापालिकेचे संबंधित अधिकारी अफसर सिद्दीकी यांना नागरिकांनी याचा जाब विचारण्यासाठी संपर्क साधला असता, आपण पुलाच्या बाजूने काम करण्याचे आदेश दिले होते, असे सांगत सारवासारव सुरू केली. नागरिकांनी ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता, त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

औरंगाबाद - फाजलपुऱ्याचा पूल आणि नहरीचे नळ तोडल्याप्रकरणी महापालिकेचे संबंधित अधिकारी अफसर सिद्दीकी यांना नागरिकांनी याचा जाब विचारण्यासाठी संपर्क साधला असता, आपण पुलाच्या बाजूने काम करण्याचे आदेश दिले होते, असे सांगत सारवासारव सुरू केली. नागरिकांनी ठेकेदाराला याबाबत विचारणा केली असता, त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

कोकणातील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऐतिहासिक पुलांचे स्ट्रक्‍चरल आणि सेफ्टी ऑडिटचे काम आगामी आठवड्याभरात सुरू होणार होते. त्यापूर्वीच या पुलांची पाडापाडी करून नव्या कामांना मंजुरी मिळवून घ्यायची, असा घाट तर घातला जात नाही ना, अशी चर्चा नागरिकांत रंगली आहे.

हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. दुलारी कुरेशी आणि इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांनी या पाडापाडीच्या ठिकाणी येऊन पाहणी केली. यानंतर स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, अय्युब जहागीरदार यांनी घटनास्थळी भेट दिली.

वेळेचे गणित चुकले
पहाटेच्या अंधारात हे काम सुरू करून गर्दीच्या वेळेपर्यंत उरकून टाकण्याचा घाट या कंपनीने घातला होता. यासाठी ब्रेकर आणि बकेटच्या साहाय्याने पूल आणि नहर तोडायला पोकलेनच्या साथीने सुरवात झाली. मात्र, पूल अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत निघाल्याने वेळ लागत गेला आणि काम लांबले. सकाळी गर्दीच्या वेळेला ही पाडापाडी लक्षात आल्यावर वाजिद अस्लम, सचिन राठोड, आनंद चव्हाण, संदीप चांदणे, प्रकाश दाभाडे आदी नागरिकांनी हे काम बंद पाडले.

आता काळा दरवाजा पुलाचा नंबर?
शहरातून वाहणारे नाले ओलांडण्यासाठी या पुलांची मुघल, निजामकाळात निर्मिती करण्यात आली. भूमिगत गटार योजनेचे कामसुद्धा याच मार्गावरून करणे कंपनीला बंधनकारक आहे. ही लाइन टाकण्यासाठी बारापुल्ला, दर्गा आणि फाजलपुरा येथील ऐतिहासिक पुलांचा या कंपनीने बळी घेतला. आता या वाटेत काळा दरवाजा आणि सिटी चौकाला जोडणारा पूलही येतो. आता या पुलाचा घास हे ठेकेदार घेणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

पोलिसांत तक्रार दाखल
ऐतिहासिक वास्तूंची पाडापाडी करून शहराच्या सांस्कृतिक वैभवाची नासधूस करणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे ठेकेदार खिल्लारी कन्स्ट्रक्‍शन आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी अफसर सिद्दीकी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाजिद अस्लम यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.

नहर-ए-अंबरीची पाडापाडी
कलेक्‍टर ऑफिसपासून जाणारी नहर-ए-अंबरीची ही पाइपलाइन शहागंजच्या मुख्य हौदात पोहोचते. आजही तिला पाणी आहे. ही नहर आणि ऐतिहासिक पूल पडून शहराचे वैभव मातीत घालण्याचे काम ठेकेदार आणि महापालिकेने केले आहे.
- रफत कुरेशी, इतिहास अभ्यासक

लज्जास्पद कृत्य
महापालिका आणि भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नहर आणि पूल तोडून काय मिळविले? पुलाच्या एखाद्या कमानीतून हे काम करता येत असताना ही वास्तू पाडण्याचा अट्टहास कशासाठी?
- डॉ. दुलारी कुरेशी, हेरिटेज कमिटी सदस्या

दोषींवर कारवाई करू
काम करणारे ठेकेदार, अधिकारी आणि संबंधितांना बोलवून घेण्यात येईल. पूल तोडण्याचे आदेश कोणी दिले, याची शहनिशा करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- मोहन मेघावाले, सभापती, महापालिका स्थायी समिती

Web Title: safety audit before the bridge victims