
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर, ता. २३ : कथेतील मर्यादित अनुभवापेक्षा कादंबरी हा प्रकार लेखकाला कायम खुणावत असतो.
Sahitya Sammelan : कादंबरी लेखन म्हणजे काळाला कवेत घेणं
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर - कथेतील मर्यादित अनुभवापेक्षा कादंबरी हा प्रकार लेखकाला कायम खुणावत असतो. मुळात कादंबरी लेखन हा काळाला कवेत घेण्याचा प्रकार असतो, म्हणून कादंबरी लेखन केले, असा सूर ‘संवाद - आजच्या कादंबरीकारांशी’ या कार्यक्रमात निघाला.
अ. भा. साहित्य संमेलनात छत्रपती शाहू महाराज सभागृहात हा कार्यक्रम संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिलला पार पडला. प्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, आसाराम लोमटे, मोनिका गजेंद्रगडकर, रमेश अंधारे आणि प्रसाद कुमठेकर यांच्याशी दत्ता घोलप आणि शीतल पावसकर यांनी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान रमेश इंगळे म्हणाले की, ‘कादंबरीचा वाचक लेखकाला समजून घेण्याचा तर कवितेचा वाचक कवीला समजून घेत नाही. अशा अवस्थेत कवीचे मूल्य खरोखरच उरले आहे काय, असा प्रश्न पडतो. माझी ‘निशाणी डावी अंगठा’ कादंबरी प्रचंड गाजली. तिथून माझ्यातील कवी मागे पडला आणि कादंबरीकार पुढे आला. त्यात व्यवस्थेचे पोस्टमार्टेम केले आहे. लेखकाचे व्यवस्थेबाबत कागदावर उतरणे हे रस्त्यावर उतरण्याइतकेच महत्त्वाचे असते.
कादंबरी निबीड अरण्यात शिरण्यासारखी गोष्ट
मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या की, ‘मौज’ प्रकाशनात संपादक असल्यामुळे माझ्या कथा लेखनाकडे श्री. पु. भागवत यांचे विशेष लक्ष होते. किती दिवस कादंबरीचे विषय कथेत कोंबणार आहेस, असे त्यांनी विचारले होते. कथा एका मर्यादित बीजात दडलेली असते. तर कादंबरी निबीड अरण्यात शिरण्यासारखी गोष्ट असते. माझी उगम कादंबरी धर्म परिवर्तनावर आधारित आहे, असेही श्रीमती गजेंद्रगडकर म्हणाल्या. रमेश अंधारे म्हणाले की, खेड्यातील संयुक्त कुटुंबाचे विघटन हा विषय मांडण्यासाठी ‘पागोरा’ कादंबरी लिहिली. कादंबरी लिहिण्यापूर्वी मी कविता लिहून पाहिली होती. सर्व वाङ्मयप्रकार हाताळायला सारखीच प्रतिभा लागते, असे रमेश अंधारे म्हणाले. पुस्तक लिहायचे एवढेच माहीत होते. पण विषयाचा आवाका कादंबरीचा आहे असे कळल्यानंतर त्याला कादंबरीचे स्वरूप दिले. ‘बगळा’ कादंबरी आकाराने लहान असली तरी तिचे भावविश्व परिपूर्ण आहे, असे प्रसाद कुमठेकर म्हणाले.
व्यवस्थेचे दंश होतात, तेव्हा कलाटणी मिळते
पत्रकार तथा शेती अभ्यासक आसाराम लोमटे म्हणाले की, पत्रकारितेत असल्यामुळे कष्टकरी, शेतकरी यांच्या चळवळी जवळून पाहिल्या आहेत. मी परभणीत शिकायला आलो तेव्हा शेतकरी संघटना विखुरण्याची सुरुवात झाली होती. हा दोन दशकांचा दस्तएवज मांडण्यासाठी कादंबरी प्रकार निवडला होता. चळवळीतील माणसांच्या आस्थेचे, धारणेचे विषय ‘तसनस’मध्ये मांडले आहेत. आपल्याला व्यवस्थेचे दंश होतात, तेव्हा कलाटणी मिळते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
संमेलननगरीतून...
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी इतर कुठल्याही मंडपात कार्यक्रम न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मुख्य सभामंडपात गवस यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. त्यांनीही सध्याची शिक्षण व्यवस्था, साहित्यविश्व, भाषेतील शुद्धलेखनाचा आग्रह आदी मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. त्यांच्या परखड मतांना श्रोत्यांचीही उत्स्फूर्त दाद मिळत होती.
संमेलनाला भेट देणाऱ्या साहित्य रसिकांनी पुस्तकांच्या स्टॉलला भेट देण्यास प्राधान्य दिले. या स्टॉलवर विश्वास पाटील, कवयित्री नीरजा, दामोदर मावजो यांच्यासह विविध लेखकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्याने रसिकांनी येथे गर्दी केली होती.
पुस्तक प्रकाशन दालनात अरुण जाखडे प्रकाशन मंचावर स्थानिक साहित्यिकांचे पुस्तक प्रकाशन दिवसभर सुरू होते. अनेक साहित्यिकांनी आपली पुस्तके येथे प्रकाशित करण्यास प्राधान्य दिले, मात्र प्रकाशनासाठी मंचावर आलेल्या साहित्यिकांचे ‘भाषण पुराण’ आवरताना सूत्रसंचालकांची त्रेधातिरपीट उडाली होती.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रताही काहीशी कमी झाली होती. विशेषतः सायंकाळी चार वाजेनंतर वारा सुटल्याने घामाघूम झालेले साहित्य रसिक आणि साहित्यिकांना काहीसा दिलासा मिळाला.
संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे वेळापत्रक कोलमडण्याचा सिलसिला दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. सकाळी ९.३० वाजता सुरू होण्याचे नियोजन असणारी राजन गवस यांची प्रकट मुलाखत दहाच्या सुमारास सुरू झाली. साहजिकच पुढचे कार्यक्रमही अर्ध्या-एक तासाच्या विलंबाने सुरू झाले. एका परिसंवादाचे अध्यक्षच विलंबाने आल्याने त्याजागी सांस्कृतिक कार्यक्रम उरकून घ्यावा लागला.
आजचे कार्यक्रम (२४ एप्रिल)
मान्यवरांचे मार्गदर्शन - दुपारी १२ ते १
परिचर्चा - दुपारी २ ते ४
सांस्कृतिक कार्यक्रम - सायंकाळी ७.३० ते ११
कविकट्टा - वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५
गझलमंज - वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५
परिसंवाद - वचन साहित्य आणि आधुनिकता ः सकाळी ९.०० ते ११.३० वा
परिसंवाद - सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार? दुपारी २.०० ते ४.००
बालकांचे कथाकथन ते सुंदर माझी शाळा - वेळ सकाळी ९ ते दुपारी ४
समारोप - सायंकाळी ५ ते ७
Web Title: Sahitya Sammelan Writing A Novel Is About Embracing Time
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..