"साई'च्या जलतरण तलावाला साडेचार लाख लिटरचा बॅलेन्सिंग टॅंक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण येथे तयार करण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावासाठी साडेचार लक्ष लिटर साठवण क्षमता असलेला बॅलेन्सिंग टॅंक तयार करण्यात येणार आहे. या टॅंकचे काम सुरू झाले असून तलावाचे कामही आता वेग घेत आहे. 

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरण येथे तयार करण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावासाठी साडेचार लक्ष लिटर साठवण क्षमता असलेला बॅलेन्सिंग टॅंक तयार करण्यात येणार आहे. या टॅंकचे काम सुरू झाले असून तलावाचे कामही आता वेग घेत आहे. 

जलतरण तलावाच्या मुख्य भागांपैकी एक असलेल्या बॅलेन्सिंग टॅंकच्या साथीने तलावाच्या पाण्याची पातळी कायम राखण्यात येते. औरंगाबादेत साकार होत असलेल्या देशातील पहिल्या स्टेनलेस स्टीलच्या जलतरण तलावाची निर्मिती भारतीय खेळ प्राधिकरणातर्फे केली जाते आहे. या जलतरण तलावाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बॅलेन्सिंग टॅंकच्या कामाचे बेड कॉक्रिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. तलावाच्या तळाशी किमान फूटभर जाड कॉंक्रिट टाकण्यात आले असून त्या पुढील कामासाठी आता स्टीलची कटिंगही सुरू करण्यात आली आहे. साडेचार लाख लिटर पाणी साठवू शकणारा हा टॅंक तीन मीटर खोल, 12.26 मीटर रुंद आणि 13.3 मीटर लांब राहणार आहे. 

काय आहे बॅलेन्सिंग टॅंक? 
एखादा माणूस पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरला तर त्याच्या हालचालीने होणाऱ्या पाण्याच्या हालचालीतून जलविसर्ग एका जलनिस्सारण यंत्रणेतून हे पाणी बॅलेन्सिंग टॅंकमध्ये पोचते. त्यानंतर पाणी शांत झाल्यावर या टॅंकमधील पाणी परत तलावात सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याची पातळी कायम राहते आणि ते घटत नाही. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या जलतरण तलावात पातळी कायम राखण्यासाठी साडेचार लाख लिटर पाणी हाताशी राहणार आहे. 

पॅव्हेलियनमध्ये खोल्यांऐवजी हॉल 
जलतरण तलावालगत पॅव्हेलियनच्या तळमजल्यावर आता खोल्यांऐवजी हॉल तयार करण्यात येणार आहेत. चार लहान खोल्यांची जागा आता दोन मोठे हॉल घेणार आहेत. येथे सुरू असलेल्या खेळ प्रशिक्षणांचे वर्ग या हॉलमध्ये हलवता येतील. सध्या या कार्यालयाकडे असलेल्या एका इनडोअर हॉलमध्ये अनेक खेळ सुरू आहेत. या हॉलवरील भार कमी करण्याचे काम हे नवीन 12 बाय 6 मीटर मापाचे हॉल करतील, असे "साई'चे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले. 

Web Title: sai swimming pool