देवगिरी किल्ल्यावर वारकऱ्यांच्या दिंड्या : पहा Video

किशोर पाटील
रविवार, 22 डिसेंबर 2019

तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रभरातून वारकरी "भानुदास-एकनाथ'चा जयघोष करत, टाळमुदंगाच्या तालावर पावली खेळत देवगिरी किल्ल्यावर दाखल होतात. मार्गशीर्ष एकादशीला बालेकिल्ल्यावरील दुर्गा तोफेखालील गुहेमध्ये असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानसमाधीचे दर्शन घेतात.

दौलताबाद (जि. औरंगाबाद) : ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार संत श्री जनार्दन स्वामी यांच्या 444व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेला रविवारी (ता. 22) सुरवात झाली. दिंड्या पालख्या घेऊन वारकऱ्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. बालेकिल्ल्यावरील गुहेत असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यान समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी हे दौलताबादचे किल्लेदार होते. त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यापताका घेऊन देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मठात दाखल झाले आहेत. शनिवारपासून (ता. 21) या पुण्यतिथी सोहळ्याला प्रारंभ झाला असून, सोमवारी (ता. 23) काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची समाप्ती होणार आहे. 

तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रभरातून वारकरी "भानुदास-एकनाथ'चा जयघोष करत, टाळमुदंगाच्या तालावर पावली खेळत देवगिरी किल्ल्यावर दाखल होतात. मार्गशीर्ष एकादशीला बालेकिल्ल्यावरील दुर्गा तोफेखालील गुहेमध्ये असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानसमाधीचे दर्शन घेतात.

Image result for janardan swami

कोण होते जनार्दन स्वामी? 

संत जनार्दन स्वामी यांचा इतिहास सुमारे 500 वर्षांपूर्वीचा, म्हणजे इसवी सन 1450 ते 1560 हा आहे. इतिहासातील नोंदीनुसार, संत जनार्दन स्वामी हे पैठणच्या संत एकनाथ महाराज यांचे गुरू. ते मूळचे चाळीसगाव येथील देशपांडे होते. नगरच्या निजामशहाच्या काळात देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. जनार्दन स्वामी यांची श्री गुरुदत्तावर प्रचंड श्रद्धा होती. किल्ल्यावरील एका गुहेत छोट्याशा जागेत ते ध्यानस्थ होत असत. येथेच त्यांना श्री गुरू दत्तात्रेयाचा साक्षात्कार होत असल्याची आख्यायिका आहे. 

Image result for shulibhanjan

एकनाथ महाराजांचे वास्तव्य 

सद्गुरुंच्या सान्निध्यात संत एकनाथ महाराजांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. जवळच्याच शूलिभंजन पर्वतावर त्यांनी तपश्‍चर्या केली होती, अशी श्रद्धा आहे. या डोंगरावर श्री दत्तगुरूंच्या पादुका आणि संत एकनाथांची तपोभूमी असलेल्या ठिकाणी आता मोठे मंदिर आहे. जनार्दन स्वामी किल्ल्यावर नसताना शत्रूचे आक्रमण झाले, त्यावेळी एकनाथ महाराजांनी हाती तलवार घेऊन लढाई जिंकल्याचे भाविक सांगतात. 

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint Janardan Swami Samadhi Sohla on Daulatabad Fort Aurangabad