फुल टू स्मार्टचा पिटारा विद्यार्थ्यांसाठी खुला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या दोन विजेत्यांना प्रत्येकी एक स्कुटी बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात आली.

औरंगाबाद - विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, उपयुक्त शैक्षणिक माहितीच्या माध्यमातून स्मार्ट बनविणारे मुलांच्या आवडीचे "फुल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ माध्यम समूहा'तर्फे सुरू करण्यात आले होते. माहिती संकलनाबरोबरच भरगच्च बक्षिसांचा खजिनाही यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. एक) "सकाळ' कार्यालयामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेच्या बक्षिसांची बंपर सोडत काढण्यात आली.

 
यावेळी सुरेंद्र झिरपे, महेश अचिंतलवार, गणेश घुले, सुरेश वाकडे, शिवाजी शेळके, चंद्रकांत भराट, वसुधा कल्याणकर, मेहबूबखान, प्रा. वीरा राठोड, आदिल मदनी, नंदकुमार जोगदंड या मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी "सकाळ'च्या अंकात "फुल टू स्मार्ट' हे सदर सुरू करण्यात आले होते. यात देश-विदेशातील माहिती, विज्ञान, मनोरंजन, खेळ, तंत्रज्ञान यावर आधारित शंभर सदरे प्रकाशित झाली. यात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकूण सव्वा कोटी रुपयांच्या 55 हजारांपेक्षा जास्त बक्षिसांचा पिटारा खुला करण्यात आला आहे. 

मराठवाड्यासाठी वेगळी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या दोन विजेत्यांना प्रत्येकी एक स्कुटी बक्षिसाच्या स्वरूपात देण्यात आली. यासह 10 रेंजर सायकल, 20 टॅब, 80 ट्रॅव्हल बॅग्स, 110 घड्याळे, 220 स्कूल वॉटर बॉटल अशी 442 बक्षिसे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 
स्पर्धेत मराठवाड्यातील मदर तेरेसा इंग्लिश स्कूल, वाळूज येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सुजाता मिलिंद सोळस आणि महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा, गोकुंदा (ता. किनवट, जि. नांदेड) येथील नहार विनोद पवार (सहावी) हे स्कुटीचे विजेते ठरले. विजेत्या सर्व विद्यार्थ्यांची नावे रविवारच्या (ता. तीन) अंकात प्रसिद्ध केली जाणार आहेत. 
 
रोज एक कुपन प्रकाशित 
भरगच्च माहितीवर आधारित असलेले रोज एक प्रश्न विचारणारे कुपन शंभर दिवस "फुल टू स्मार्ट' पानावर प्रकाशित करण्यात आले होते. या सदरात विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर विद्यार्थ्यांनी लिहून ते कुपन शाळेत मिळालेल्या प्रवेशिकेवर चिकटवायचे होते. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतून एकूण 7,343 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Full to Smart Competition Result Declare In Aurangabad