‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचा आज वर्धापनदिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

औरंगाबाद - जाणते वाचक, लेखक, रसिक, जाहिरातदार, वितरक आणि सर्व क्षेत्रांतील स्नेहीजनांच्या मेळाव्यात शुक्रवारी (ता. एक जून) ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या वेळी आयोजित चहापान आणि ‘रंग जल्लोष’ या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, हे आग्रहाचे आमंत्रण.

‘सकाळ’ला मराठवाड्यात आपल्या निष्पक्ष भूमिकेमुळे आणि सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक यासह इतर क्षेत्रांतील प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे वाचकांचे कायम भरभरून प्रेम लाभले आहे.

त्यातूनच गेली १९ वर्षे तयार झालेले विश्‍वासाचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी वर्धापनदिनी स्नेहमिलनाचे निमित्त. यंदा ‘सकाळ’ची मराठवाडा आवृत्ती विसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे या समारंभाला वाचकांची भरभरून उपस्थिती हा आनंद द्विगुणित करेलच.

सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात सायंकाळी साडेपाचला या कार्यक्रमाला प्रारंभ होईल. सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत स्नेहमिलनाचा कार्यक्रम होणार आहे. ‘सकाळ’चे सर्व वाचक, लेखक, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांच्यासाठी आयोजित चहापान समारंभाला आपण आवर्जून उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.

गुणीजनांचा होणार गौरव
समाजासाठी काम करून आदर्श निर्माण करणाऱ्यांचा वर्धापनदिनी गौरव करणे ही ‘सकाळ’ची विधायक परंपरा राहिली आहे. या परंपरेनुसार यंदा एव्हरेस्टवीर प्रा. मनीषा वाघमारे, उपक्रमशील सरपंच गोविंदराव माकणे, शूर बालक दिगंबर काळे, यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला गिरीश बदोले, शेकडो लोकांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करणारे श्रीमंत गोर्डे पाटील, समाजाने नाकारलेल्या महिलांसाठी कार्य करणाऱ्या रेणुका कड, रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाणारे संतोष सोमाणी, मनोरुग्णांना आधार देणारे सुमित पंडित, अनाथांचे आई-वडील प्रीती व संतोष गर्जे, गाव पाणीदार बनवण्यासाठी झटणारे शिक्षक सुधाकर पवार, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू खुशी डोंगरे, बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे, अशा ११ मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

अनुभवा ‘रंग जल्लोष’ 
नृत्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या भार्गवी चिरमुले आणि तेजा देवकर यांची नेत्रदीपक अदाकारी, अजित विसपुते आणि मानसी परांजपे यांचे बहारदार गायन आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ फेम विनोदी कलावंत संदीप गायकवाड, नम्रता आवटे यांचे दिलखुलास सादरीकरण या आनंदसोहळ्यात पाहायला मिळणार आहे. आबालवृद्धांसाठी अतिशय मनोरंजक अशा या कार्यक्रमाला वाचकांनी सहकुटुंब उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: sakal marathwada anniversary