तात्पुरत्या औषधांचा डोस कुचकामी!

मनोज साखरे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

औरंगाबाद - बीडबायपास रस्त्यावरील अपघाताचे सत्र थांबविण्यासाठी ठोस उपाय सापडला नाही. त्यामुळे प्रशासनाने जडवाहतूक वळविण्याचा तात्पुरता डोस सुरू केला; पण तो आता अपाय करीत असून, पोलिस आयुक्तांचा हा प्रयोगच फसल्याचे चित्र आहे. पैठण लिंकरोड व झाल्टा फाटा येथे वाहनांची कोंडी निर्माण झाली. परिणामी, अपघातांची शक्‍यता बळावली असून तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल दोन तासांचा कोंडमारा नागरिक व वाहनधारकांना करावा लागत आहे.

या मार्गावर प्रयोगिक तत्त्वावर सात दिवस जडवाहनांना बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. अठरा एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली; पण आता हा प्रयोग अंगलट येण्याची शक्‍यता वाढली असून, रोगापेक्षा इलाज भयंकर असेच झाले आहे. या बंदीमुळे अन्य ठिकाणांहून येणारी मालवाहतूक विस्कळित झाली. उद्योगांना व अन्नधान्य वितरणाला फटका बसला आहे. मालधक्‍क्‍यावरही अडचणी वाढल्या. विशेषत: पुणे-धुळे, मुंबईसह विविध ठिकाणांहून येणारी जडवाहने अनुक्रमे पैठण लिंकरस्ता व झाल्टाफाटा येथे अडविली जात आहेत. त्यामुळे दुतर्फा जडवाहनांच्या रांगा लागल्यात. रस्त्याच्या दुतर्फा ही जड वाहने लावण्यास मज्जाव करून त्यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करून द्यावी, त्यासाठी प्रशासनाने जागाही उपलब्ध करून द्यायला हवी.    

सर्व्हिस रस्ता हवाच
बीडबायपासला सर्व्हिस रस्त्यांची मोठी आवश्‍यकता आहे. या मार्गावर जडवाहतूक बंद करून चालणार नाही. सुयोग्य व्यवस्थापन पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून व्हायला हवे. तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय हवेत. तसेच रिंग रोड व नव्या बायपासची गरजही आहे. या उपायानंतरच बीडबायपासची समस्या दूर होऊ शकेल.

एका वाहनाला दोन तासांची कसरत
कांचनवाडीतून अखंड वाहतूक शहरात होते. यात दुचाकीस्वारांचाही समावेश आहे; पण रस्त्याच्या दुतर्फा जडवाहनांमुळे दुचाकी, छोटी व मध्यम वाहने व महामंडळाच्या बसला अडचण होत आहे. परिणामी, वाहतुकीचाच खोळंबा झाला असून, तीन किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागत आहे. 

स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मालवाहतूकदारांना फटका बसला. या भागातील स्थानिकांचा कोंडमारा झाला. आयुक्तांच्या प्रयोगाचे अनिष्ठ परिणाम होत असून, त्वरित हा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Web Title: sakal news impact