‘भंगार’ वाहने उचलणार

‘भंगार’ वाहने उचलणार

औरंगाबाद - रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेल्या भंगार वाहनांचा अडथळा लवकरच दूर होणार आहे. महापालिका, पोलिस व आरटीओमार्फत दोन डिसेंबरला संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. पूर्वतयारीसाठी सोमवारी (ता. २६) पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. 

शहरातील रस्त्यांवर शेकडो भंगार वाहने पडून आहेत. त्यामुळे एकीकडे शहराचे विद्रुपीकरण होत आहे तर दुसरीकडे  वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शासनाने महापालिकेला धोरण ठरविण्याचे सूचित केले होते. त्यासाठी पोलिस, आरटीओ व जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र महापालिकेचे धोरण ठरत नसल्याने ‘सकाळ’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. दरम्यान, सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह आरटीओ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी दोन डिसेंबरला भंगार वाहने जप्त करण्याची जम्बो मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नऊ पथकांची स्थापना 
महापालिकेने भंगार वाहनांचा प्रभागनिहाय सर्व्हे केला असून, त्यानुसार नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका अधिकाऱ्यांसह एक पोलिस अधिकारी, दोन कर्मचारी व आरटीओ अधिकाऱ्याचा या पथकात समावेश राहणार आहे.

आणखी एक संधी 
दोन डिसेंबरला मोहीम राबविण्यात येणार असली तरी त्यापूर्वी वाहनधारकांना संधी दिली जाणार आहे. दोन डिसेंबरपूर्वी आपल्या वाहनांची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. जमा झालेली भंगार वाहने गरवारे क्रीडा संकुलाच्या मोकळ्या जागेवर जमा केली जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com