कापूस बियाणे विक्रीला तूर्तास स्‍थगिती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना - मागील दोन वर्षात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आलेले आहे. असे असले तरीही बोंडअळीचा यंदा धोका उद्‌भवू शकतो.  त्यामुळे कृषी विभागाने कपाशीची पूर्वहंगामी लागवड  रोखण्यासाठी बियाणे विक्री न करण्याच्या सूचना कृषी केंद्रांना दिल्या आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड करण्यात येते. गत वर्षी दोन लाख ८६ हजाराहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ७९ हजार कपाशी बियाणाचे पाकिटे लागणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८ हजार पाकिटाचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, सदर बियाणे विक्री न  करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्याची माहिती कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिली आहे.  

जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांनी जानेवारी नंतरही कपाशीचे पीक शेतात ठेवले होते. तसेच वाढीव पावसामुळे लांबलेल्या कापूस हंगाम त्याचबरोबर सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही कपाशीचे पीक उभे आहे. त्यामुळे बोंड अळीस नियमित खाद्य पुरवठा होऊन पुढील हंगामातील पिकांवर बोंडअळीचा  प्रादुर्भाव होऊ शकतो.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगाम सुरू होतो. मात्र, सिंचनाची व्यवस्था असलेले अनेक शेतकरी त्यापूर्वीच त्याची लागवड करतात. पूर्व हंगामी लागवड झाल्यामुळे बोंडअळीचा  प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्व हंगामी लागवड रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्व कृषी सेवा केंद्रांना कपाशी बियाणे शेतकऱ्यांना विक्री न करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिली आहे.

कपाशी पिकाची पूर्व हंगामी लागवड रोखण्यासाठी तुर्तास बियाणे विक्री न करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बियाणांची विक्री करू नये अशा सूचना  जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत. 
-भिमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com