बंदी असलेल्या औषधांची विक्री

औरंगाबाद - शहरातील मयूरपार्क येथील औषध दुकानातील हा औषधसाठा गोठवण्यात आला.
औरंगाबाद - शहरातील मयूरपार्क येथील औषध दुकानातील हा औषधसाठा गोठवण्यात आला.

औरंगाबाद - देशात प्रतिबंधित असलेल्या औषधांची शहरात आयात करून महाराष्ट्रासह शेजारील राज्यात विक्री केली जात होती. या गंभीर प्रकाराची खबऱ्याकडून माहिती मिळताच केंद्र आणि राज्य शासनाच्या औषध प्रशासनाने ६४५ प्रकारच्या औषधींचा २२ लाखांचा साठा गोठवला आहे, अशी माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे यांनी गुरुवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली.

परवानगी नसलेल्या औषधांची शहरातील मयूरपार्क परिसरातील सानाई मार्केटच्या गाळा नंबर चारमधून विक्री होत असल्याची गुप्त माहिती औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार स्वप्नरूप ड्रॅग्स ॲण्ड फार्मास्युटिकल्सवर कार्यवाही केली. यात परवानगी नसलेल्या औषधांची आयात व विक्री आणि आयात केलेल्या बल्क ड्रग्स्‌ची लहान लहान पॅकिंग करून महाराष्ट्रासह इतर राज्यात विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. ही कार्यवाही श्री. काळे यांच्या मार्गदर्शनात केंद्राचे औषध निरीक्षक डॉ. सचिन भागवते व राज्याचे निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी केली. विनापरवानगी आयात संदर्भात या प्रकरणात केंद्र शासन तर रिपॅकिंग संदर्भात राज्याचे औषध प्रशासन कारवाई करेल, असे औषध निरीक्षक बजाज यांनी स्पष्ट केले. 

...तर पोलिसांत गुन्हा
कारवाई केलेल्या दुकानातील औषधी हलवू नये किंवा नष्ट करू नये, अशी नोटीस नियम १५ नुसार संबंधिताला दिली आहे. दरम्यान, त्या औषध विक्रेत्याला खरेदी व त्या औषधाची परवानगीची माहिती द्यावी लागेल. तोपर्यंत ही औषधी सील केली जाईल. या प्रकरणात योग्य माहिती न दिल्यास जप्ती करून पोलिसांत गुन्हा नोंद होईल, असेही औषध प्रशासनाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण... 
मेडोड्रीन हायपरक्‍लोराईड, अफाटिनीव, थायलो ग्राफ्टिनबॅंझाय, ॲगो मेटालिन यासारखे मधुमेह, रक्तदाब व कर्करोगाच्या औषधांना केंद्र शासनाने विक्रीची किंवा बनवण्याची परवानगी दिलेली नाही. ते बनवण्यासाठी मूळ झारखंड येथील आणि सध्या औरंगाबादेत वास्तव्यास असलेला दुलाल महातो हा बल्क ड्रग्स विदेशातून आयात करत होता. या प्रकरणी केंद्राचे पथक तपास करत असून, अशी मराठवाड्यातील पहिली कार्यवाही असल्याचे असे श्री. काळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com