सलाईनचे स्टँड नसल्याने दिले चिमुकलीच्या हातात सलाईन

योगेश पायघन
बुधवार, 9 मे 2018

या प्रकरणाची चौकशी केली. शिफ्टिंगवेळी हा प्रकार घडला आहे. तेव्हा हा फोटो काढण्यात आला आहे. तरी यापुढे असे प्रकार घडू नये, यासाठी सूचना दिल्या आहेत. 

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

औरंगाबाद : सलाईनचे स्टँड मिळाले नाही म्हणून चिमुकलीला सलाईन पकडून उभे केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील दयनीय अवस्था समोर आली आहे. सोमवारी (ता. 7) सर्जरी विभागात ऑपरेशन झाल्यावर वॉर्ड 19 मध्ये शिफ्ट करताना हा प्रकार घडला असून सलाईनचे स्टँड मिळेपर्यत अर्धातास सात वर्षीय चिमुकली सलाईन धरुन उभी होती. या घटनेचा सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

खुलताबाद तालुक्‍यातील भटजी येथील एकनाथ गवळी हे शनिवारी (ता. पाच) घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सोमवारी त्यांचे ऑपरेशन पार पडले. त्यानंतर पेशंट शिफ्ट करताना डॉक्‍टरांनी सलाईनची बाटली त्यांच्या मुलीच्या हातात दिली. ऑपरेशन थिएटरपासून ते वॉर्ड क्रमांक 19 पर्यंत सलाईनची बाटली मुलीच्या हातातच होती. वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यावरही अर्धातास मुलगी सलाईन धरुन उभी होती. दरम्यान, त्या मुलीच्या भावाने आयव्ही स्टँड शोधला. त्यावेळी दोन्ही भावा बहिणींची सुटका झाली.

एकनाथ गवळी यांची पत्नी नसल्याने मुलगी आणि तिचा भाऊ गेल्या तीन दिवसांपासून काळजी घेत असल्याचे शेजारी रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. बुधवारी (ता. 9) त्यांना वार्ड 17 मध्ये शिफ्ट करण्यात आले असून तेथे उपचार सुरु आहेत. 

Web Title: Saline stand not available then stays in the hands with girl child