भांडवलदारांच्या 'चाकरांना' मंत्रालयात सहायक सचिवपदी कसे काय नेमणार? 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 27 जून 2018

घटनाबाह्य असलेला हा प्रकार थांबवा, अन्यथा आम्ही हाणून पाडू, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. 

औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नियमांना डावलत भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्रालयातील सहायक सचिवपदी थेट नियुक्‍तीला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. घटनाबाह्य असलेला हा प्रकार थांबवा, अन्यथा आम्ही हाणून पाडू, असा इशाराही दिला आहे. 

या प्रश्‍नी मंगळवारी (ता. 26) विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन संभाजी ब्रिगेडने निवेदन सादर केले. यात म्हटले, की युपीएससी, एमपीएससीच्या नियमांना डावलून भाजप सरकारने घटनाबाह्य असा अजब निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत थेट प्रवेश देऊन दहा जागांवर सहायक सचिवपदी निवड करण्याचा घाट घातला आहे. हा प्रकार लोकशाहीला मारक व संविधान विरोधी असून धोकादायक आहे. 

देशभरात ग्रामीण भागातील सर्व जाती, धर्मांची मुले-मुली स्पर्धा परीक्षेसाठी कर्ज काढून शिकत आहेत. आपल्या बुद्धीच्या जोरावर आज सर्वत्र ही मुले कुठे कमी नाहीत; मात्र भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये "चाकरी' करणारे लोक थेट शासकीय सेवेत घेणे म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टाच आहे. हा निर्णय आम्ही हाणून पाडू, असा इशाराही यावेळी दिला आहे. 

या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, राहुल भोसले, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, रेखा वहाटुळे, वैभव बोडखे, रविराज हबिले, संजय सोमवंशी, ऋषिकेश राऊत, सुनील मराठे, अक्षय मेलगट, रवींद्र वहाटुळे, तुषार जाधव, रवी बोचरे, अण्णा बावस्कर, राजेंद्र पाटील, कृष्णा गांधीले, अक्षय काकडे, प्रदीप औताडे यांची नावे आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sambhaji Brigade opposed to The governments decision