रामदास स्वामींचे शिल्प बसवल्यास आंदोलन : संभाजी ब्रिगेड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता. 15) दिला. 

औरंगाबाद - जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता. 15) दिला. 

विभागीय आयुक्‍तांमार्फत मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेडने निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला. डॉ. भानुसे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची एकदाही भेट झालेली नाही. रामदास स्वामींचे स्वराज्य उभारणीतही योगदान नाही. एवढेच नव्हे तर, रामदास स्वामी हे आदिलशहा आणि औरंगजेबाचे हेर असल्याचे उच्च न्यायालयातील राज्य सरकार विरुद्ध मा. म. देशमुख यांच्या "मध्ययुगीन भारताचा इतिहास' या ग्रंथावरील खटल्यादरम्यान सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने रामदास आणि शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. नियोजित शिल्पातून इतिहासाचे विकृतीकरण करून महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे समूह शिल्पातून ते शिल्प नाही हटवल्यास, तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

जेएनपीटी येथील शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 17) उद्‌घाटन होत आहे. तत्पूर्वी हा इशारा देण्यात आला आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली. परिषदेस आर. एस. पवार, डॉ. सुभाष बागल, रमेश गायकवाड, हेमाताई पाटील, रेखाताई वहाटुळे यांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade's press conference on Samarth Ramdas Swami