‘या’ जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर संभाजी सेनेचा गोंधळ

गणेश पांडे
Saturday, 5 September 2020

परभणी जिल्ह्यातील संभाजी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदारांच्या निवासस्थानासमोर शनिवारी (ता. पाच) गोंधळ आंदोलन केले. राज्य शासनाने वैद्यकीय प्रवेशाचा ७०:३० फॉर्म्युला रद्द करावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. 

परभणी - राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने शनिवारी (ता. पाच) जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर गोंधळ आंदोलन करण्यात आले. 

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या ७०:३० या फॉर्म्युलामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी हा वैद्यकीय प्रवेशासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला तत्काळ रदद् करण्यात यावा, या मागणीसाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी सेनेच्या वतीने गोंधळ आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचा - नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह

या आहेत मागण्या...
गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, मोर्चे, उपोषणे इत्यादी प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये यापूर्वी वेळोवेळी मोर्चे काढले आहेत. याच मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने ता. १६ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार होते. कोरोनाच्या महामारीमुळे सदरील आंदोलन रद्द करण्यात आले होते; परंतु ता. १३ सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा होत असल्याने आणि ता. सात सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहांमध्ये मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा आणि मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी न्याय द्यावा; तसेच ७०:३० चा फॉर्म्युला तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी शनिवारी (ता. पाच) जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर संभाजी सेनेच्या वतीने गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला ‘अक्षर परिवारातील’ शिक्षकांचा गौरव, कसा? ते वाचाच

आंदोलनात हे झाले सहभागी
परभणीतील आमदार डॉ. राहुल पाटील तसेच जिल्ह्यातील आमदार मेघना बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आदींच्या घरासमोर संघटनेच्या वतीने गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संघटक विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, विद्यार्थी शहराध्यक्ष सोनू पवार, पवन कुरील, रवी तांबे, माधव थिटे, डॉ. उद्धव देशमुख यांच्यासह इतरांचा सहभाग होता. 

संपादन - अभय कुळकजाईकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Sena agitation in front of MLA's house, Parbhani news