‘समृद्धी’च्‍या उभारणीचा श्रीगणेशा

Samruddhi-Highway
Samruddhi-Highway

जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये रस्त्याची भरणी सुरू महामार्ग उभारणीसाठी रस्त्यांचे जाळे सज्ज
औरंगाबाद - राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा भूमिपूजन सोहळा अद्याप झालेला नाही. मात्र त्याची वाट न पाहता सर्व दहा जिल्ह्यांमध्ये या रस्त्याच्या उभारणीच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे. या रस्त्यासाठी आवश्‍यक अशी उंची तयार केली जात असल्याने या एक्‍स्प्रेस-वेची व्याप्ती नजरेस पडायला सुरवात झाली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील सुरू असलेल्या कामांचा हा लेखाजोखा...

नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित अशा ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाने अनेक अडथळ्यांच्या शर्यती अखेर ओलांडल्या आहेत. जमीन अधिग्रहणावरून गाजलेल्या या प्रकल्पाचा आता कागदावरून प्रत्यक्षात येण्याचा प्रवास सुरू झाला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून या रस्त्याची उभारणी केली जाईल. या सर्व जिल्ह्यांमध्ये ‘समृद्धी महामार्ग सुपर कम्युनिकेशन एक्‍स्प्रेस-वे’ची उभारणी सुरू झाली आहे. या रस्त्याचे काम आता मोजमापाच्या पलीकडे गेले असून, आता रस्ता प्रत्यक्षात रूप घ्यायला लागला आहे.

औरंगाबाद-जालन्यात तीन पॅकेज
औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये तीन पॅकेज तयार करण्यात आले आहेत. एकूण सोळापैकी आठ, नऊ आणि दहा असे तीन पॅकेज या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यात पॅकेज ८ - न्हावा ते गेवराई - ४२.७२ कि.मी. पॅकेज ९ - बेंडेवाडी ते फतियाबाद - ५४.०४ कि.मी. पॅकेज १० - फतियाबाद ते सुराळा - ५७.९१ कि.मी. एकूण १५४.६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू करण्यात आले आहे.

कार्यालयांची उभारणी सुरू 
या रस्त्याची उभारणी वेगाने करता येण्यासाठी, कामाचे निरीक्षण सुटसुटीतपणे करता यावे यासाठी या विविध पॅकेजचे कार्यालय तयार करण्यात येत आहेत. या कार्यालयांलगत कामगारांच्या वसाहती आणि त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात येत आहेत. बकापूर येथे काँक्रिट तयार करण्याचा प्लॅंट तयार करण्यात येत आहे. वरझडीत शेवगा, भांबर्डा आदी ठिकाणी हे तयार करण्यात येणार आहे.

न्हावा ते गेवराई
महामार्गावर १०० ते १२० कि.मी. प्रतितास वेग कायम राखण्यासाठी त्याचा तळ हा सपाट आणि समान उंचीचा तयार करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी भर घालून एक सपाट आणि जमिनीपेक्षा उंच असा पाया तयार करण्यात येत आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांना किमान अडथळे येतील आणि वेग कायम राहण्यास मदत होणार आहे. याशिवाय कंत्राट मिळविणाऱ्या कंपन्‍यांनी माती आणि दगडांचे परिक्षण करण्यासाठी स्‍वतंत्र अशा प्रयोगशाळा उभारल्‍या आहेत.

लहान पुलांची उभारणी सुरू
विद्यमान महामार्गाचा भाग या एक्‍स्प्रेस-वेच्या उभारणीत वापरण्यात येणार नसल्याने अनेक ठिकाणी असलेल्या नद्या आणि नाल्यांवर इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करण्यात येत आहेत. या पॅकेजमध्ये १८ लहान पुलांचा समावेश आहे. या पुलांची उभारणी सुरू झाली असून, त्यांच्या दोन्ही बाजूने भरती टाकून सपाटीकरणाचे काम सुरू आहे. 

बेंडेवाडी ते फतियाबाद 
सपाटीकरण, डोंगराचे अडथळे रस्त्याची उंची आणि एकसारखेपणा कायम राहण्यासाठी पायाभरणी सुरू आहे. त्यावर एकसारख्या पद्धतीने पाणी टाकण्यासाठी टॅंकर कार्यरत आहेत. त्यावर रोलरच्या फेऱ्या सुरू असून त्यांची दबाई करण्यात येत आहे. या पॅकेजमध्ये पळशी आणि करमाड भागात काही डोंगरी भाग आला आहे. या भागात सपाटीकरणाचे काम करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पोकलेन तैनात आहेत. हिल कटिंग सुरू असलेल्या भागात सपाट ठिकाणी एम्बार्कमेंट (पाया) तयार करण्यात येत आहे.

‘राईट ऑफ वे’चे जाळे
मुख्य रस्त्याचे रेखांकन जिथून आहे, तेथे रस्ता तयार करण्यासाठी वाहने आणि यंत्रणा पोचवण्यासाठी ‘राईट ऑफ वे’ अर्थात साहाय्य करणारे रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. यामुळे मुख्य रस्त्याच्या उभारणीला मदत होणार आहे. या रस्त्यांच्या उभारणीच्या कामाची आणि त्यात वापरलेल्या कच्च्या मालाची तपासणी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्याचेही काम सध्या सुरू आहे. 

फतियाबाद ते सुराळा
औरंगाबाद आणि परिघातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता, रस्ता उभारणीच्या कामावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे. पडेगाव येथे औरंगाबाद महानगरपालिकेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅंट कार्यरत आहे. या प्लॅंटमधून निघणारे पाणी नाल्यात सोडण्याऐवजी समृद्धी महामार्गासाठी वापरले जात आहे. आतापर्यंत महापालिकेच्या एसटीपीमधून प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेचे १४४ टॅंकर भरून पाठवण्यात आले आहेत.

‘ओरिजनल ग्राउंड लेव्हल’वर काम
ओरिजनल ग्राउंड लेव्हलवरही (ओएलजी) या पॅकेजमध्ये काम सध्या सुरू आहे. भरती टाकून रस्त्याची लेव्हल उंच करण्याची गरज नाही तेथे यंत्रांच्या साहाय्याने सपाटीकरण आणि दबाईचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्यावरील अंतिम थर काँक्रिटचा राहणार असून, त्यासाठी अनेक ठिकाणी काँक्रिट मिक्‍सिंग प्लॅंट कार्यरत राहणार आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com