"समृद्धी'च्या तीन बछड्यांचे झाले बारसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अडीच महिन्यांनंतर मारला बछड्यांनी पिंजऱ्यामध्ये फेरफटका

अडीच महिन्यांनंतर मारला बछड्यांनी पिंजऱ्यामध्ये फेरफटका
औरंगाबाद - "गेले अडीच महिने मातेच्या अवतीभोवती छोट्याशा पिंजऱ्यात घिरट्या मारून मारून जाम कंटाळून गेलो होतो, आपले नाव ठेवण्याच्या निमित्ताने का असेना, आपल्याला त्या छोट्याशा पिंजऱ्याबाहेर येऊन मोकळ्या वातावरणात हुंदडायची संधी मिळाली...' असा मनाशी विचार करत पिवळी वाघीण समृद्धीच्या तीन बछड्यांनी अख्ख्या पिंजऱ्यात मनसोक्‍त उड्या मारल्या. त्यांना पकडता पकडता त्यांच्या काळजीवाहकांची दमछाक झाली. निमित्त होते या तीन बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचे. महापौर भगवान घडामोडे यांच्यासह महापालिका पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नामकरण केले. पंधरा दिवसांनंतर हे बछडे नागरिकांना पाहण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.

वीर, शक्‍ती आणि भक्‍ती अशी त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. पांढऱ्या बछड्याचे नाव वीर ठेवण्यात आले आहे.

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील रॉयल बेंगॉल टायगर प्रजातीची वाघीण समृद्धीने गेल्या 12 नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजता तीन बछड्यांना जन्म दिला. तिने दिलेल्या बछड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पिवळ्या वाघिणीने दोन पिवळ्या, तर एका पांढऱ्या बछड्याला जन्म दिला; यामुळे हा कुतूहलाचा विषय बनला होता. या तीन बछड्यांपैकी एक पांढरे आणि एक पिवळे असे दोन नर असून एक मादी आहे.

तीनही बछड्यांची चांगली देखभाल झाल्याने व त्यांना चांगले वातावरण लाभल्याने तिघेही सुदृढ बनले आहेत. पिवळ्या बछड्यांपैकी एकाचे 6 किलो तीनशे ग्रॅम, दुसऱ्याचे 6 किलो तर पांढऱ्या बछड्याचे वजन 7 किलो 200 ग्रॅम इतके भरले आहे.

तीन महिन्यांचे झाल्यानंतर या बछड्यांना मोठ्या पिंजऱ्यातील मोकळ्या वातावरणात सोडण्यात येते. गुरुवारी (ता. 12) या बछड्यांना पहिल्यांदा आईच्या कुशीतून बाहेर आणण्यात आले. त्यांना बाहेर आणण्यापूर्वी प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने पिंजऱ्यात त्या बछड्यांना नैसर्गिक वातावरणात, जंगलात फिरत असल्याचा, तसेच उंचावर जाऊन खाली उतरण्याचा सराव व्हावा यासाठी कृत्रिमरीत्या तयार केलेले उंचवटे, बोगदे, गुहा यांना ठीकठाक केले. महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते गजानन मनगटे व विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार यांनी मिळून तिन्ही बछड्यांचे नामकरण केले.

महापौर, सभापतींनी फिरविला डोक्‍यावरून हात
वाघांच्या बछड्यांची तीन महिन्यांचे होईपर्यंत खूप काळजी घेतली जाते. त्यांना मानवी स्पर्शापासून शक्‍यतो दूर ठेवले जाते; मात्र नामकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महापौर भगवान घडामोडे, सभापती मोहन मेघावाले यांनी बछड्यांसोबत फोटो घेण्याचा अग्रह धरल्याने केअरटेकरनी नाइलाजाने बछड्यांना त्यांच्या पुढे केले. सभापतींनी बिनदिक्‍कत वाघाच्या बछड्याच्या डोकावरून हात फिरविला; मात्र महापौरांचे हात थोडेसे अडखळले होते.

Web Title: samruddhi tiger calf naming ceremont