समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी चीन, रशिया, कोरिया, कुवैतमधील कंपन्याही उत्सुक

शेखलाल शेख
शुक्रवार, 9 जून 2017

  • चीन, रशिया, इटली, कोरिया, कुवैत आणि सिंगापुरच्या कंपन्या देखिल उत्सुक
  • 700 किमी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 16 टप्प्यांमध्ये विभाजन
  • महामार्गाचे बांधकाम 1 ऑक्‍टोंबर 2017 पासून सुरु करण्याचा मानस
  • ऑक्‍टोंबर 2019 पर्यंत काम पुर्ण करण्याचे एमएसआरडीसीने उदिष्ट

औरंगाबाद - प्रस्तावित नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्‍सप्रेसवेच्या (एनएमएससीई) बांधकामासाठी राज्य रस्ते विकास प्राधिकरणाला (एमएसआरडीसी) 33 कंपन्यांकडून पूर्व पात्रता अर्ज प्राप्त झाले आहे. या 33 कंपन्यांपैकी 17 एकल असून उर्वरित संयुक्त उपक्रम कंपन्या आहेत. एमएसआरडीसीने जानेवारी 2017 मध्ये हे अर्ज मागविले होते. समृद्धी महामार्ग हा 46 हजार कोटींचा प्रकल्प असून तो 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा आहे. हा महामार्ग उभारण्यासाठी चीन, रशिया, इटली, कोरिया, कुवैत आणि सिंगापुरच्या कंपन्या देखिल उत्सुक आहेत.

एकूण 21 भारतीय कंपन्यांनी आपले अर्ज सादर केले आहे. चीनमधून 4 कंपन्या, रशियातून 2, टर्कीतून 2 आणि इटली, कुवैत, कोरिया आणि सिंगापुरमधून प्रत्येकी एक पुर्व पात्रता अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र समृद्धी महामार्गांचं काम करण्यासाठी एमएसआरडीसीने या 700 किमी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 16 टप्प्यांमध्ये विभाजित केले आहे. या प्रकल्पामध्ये उत्सुकता दाखविलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्‍शन कंपनी, लार्सन ऍण्ड टुब्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर, गॅमन इंडीया, अशोका बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्‍टस, सिम्प्लेक्‍स इन्फ्रास्ट्रक्‍चर यांचा समावेश आहे.

एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलावर म्हणाले की, जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी या प्रकलसाठी पुर्व पात्रता अर्ज सादर करणे म्हणजे या महत्वकांक्षी प्रकल्पाबदल्लचा त्यांचा विश्‍वास अधिक दृढ झाल्यासारखे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समृद्धी तर येणारच आहे शिवाय काही कंपन्यांच्या हितासाठी महामंडळाने विशिष्ट अटी घातल्याचे आरोपी देखील आता बिनबुडाचे ठरतील.

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थाकीय संचालक किरण कुरुंदकर म्हणाले, आम्हाला या प्रक्रीयेला खुप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही सर्व अर्जाचे विश्‍लेषण करत आहोत आणि लवकरच वर्क ऑर्डर जाहीर करु अशी पेक्षा आहे. या महामार्गाचे बांधकाम 1 ऑक्‍टोंबर 2017 पासून सुरु करुन ऑक्‍टोंबर 2019 पर्यंत पुर्ण करण्याचे एमएसआरडीसीने ठरवले आहे.

Web Title: samrudhi highway construction marathi news maharashtra news china russia