‘सनातन’ची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - विचारवंतांच्या हत्या व त्यानंतर तपासात कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या सहभागाची शक्‍यता उघड होत असताना आता ‘सनातन’ची अत्यंत गोपनीय पातळीवर झाडाझडती घेण्यात येत आहे. संघटनेचे कामकाज, हालचाली, सक्रिय सदस्य, कार्यकर्त्यांची अद्ययावत माहिती गोळा केली जात आहे. अशी माहिती गोळा करण्याबाबत एक पत्रच पोलिस, तपास यंत्रणांना प्राप्त झाले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या एकापाठोपाठ हत्या झाल्या. या प्रकरणांत उजव्या विचारसरणीशी निगडित (कट्टर हिंदुत्ववादी) व्यक्तींचा सहभाग असल्याचे आरोप झाले. त्यानंतर प्रत्यक्ष तपास, अटक झालेल्या व्यक्तींचा संबंध जहाल हिंदुत्ववादी, ‘सनातन’शी असल्याचे समोर येत आहे, तसे दावे केले जात आहेत. दहा ऑगस्टला नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणाचा झालेला उलगडा व सनातन संस्थेचा सहभाग यामुळे या संघटनेवर बंदीची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘सनातन’ची सखोल माहिती, लिंकिंग तपासली जात आहे. ‘सनातन’च्या कार्यकर्त्यांची अद्यावत माहिती घेतली जात आहे.

कार्यकर्ते रडारवर 
पत्र मिळाल्यानंतर पोलिस व तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सनातनच्या हालचाली; तसेच कार्यकर्त्यांचे लेटेस्ट अपडेट्‌स घेतले जात आहेत. यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गृहविभागातर्फे पत्र
गृहविभाग, पोलिस महासंचालक कार्यालयाने पोलिस विभाग; तसेच तपास यंत्रणांना एक पत्र पाठविले आहे. यात सनातनची अद्ययावत माहिती गोळा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तपास यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या पत्राला दुजोरा दिला.

या मुद्यांवर मागविली माहिती
  सनातन संघटनेशी संबंधित असलेल्यांची सखोल माहिती घ्यावी
  अशा व्यक्ती काय काम करतात, जबाबदारी कोणती, हालचाली काय?
  सनातनशिवाय संबंधित इतर कोणत्या संघटनांच्या नावाने काम करीत आहेत?

Web Title: Sanatan Sanstha Inquiry police