महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

गेवराई - अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात नऊ वाळू तस्करांनी दगडफेक केली, त्यानंतर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (ता. सात) पहाटे तालुक्‍यातील गुंतेगाव येथे घडली. या हल्ल्यात नायब तहसीलदारांसह पाचजण जखमी झाले आहेत.

तालुक्‍यातील गुंतेगाव येथील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा केला जात होता. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेवराई तहसीलच्या महसूल विभागाचे पथक शुक्रवारी पहाटे गुंतेगाव येथील गोदावरी पात्रात गेले. या पथकात नायब तहसीलदार वैजनाथ जोशी, तलाठी राहुल मिसाळ, माणिक पांढरे, प्रकाश निकाळजे, अशोक खिंडरे आणि चालक सत्तार हे सहभागी होते. या पथकाने या ठिकाणी एक ट्रक ताब्यात घेतला असता, या वेळी नऊ वाळू तस्करांनी या पथकावर अंधाराचा फायदा घेऊन दगडफेक केली; तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या घटनेत तहसीलदार वैजनाथ जोशी, तलाठी राहुल मिसाळ, माणिक पांढरे, प्रकाश निकाळजे, अशोक खिंडरे हे जखमी झाले. महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार वैजनाथ जोशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाळू तस्करांची स्वीफ्ट कार ताब्यात घेतली असून, या प्रकरणी गुंतेगाव येथील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

Web Title: sand smuggler attack on revenue team