वाळू तस्करांवर कारवाईचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद - बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी (ता. १३) उस्मानाबादसह तुळजापूर तालुक्‍यात वाळू तस्करांवर कारवाई केली. खानापूर ते इटकळ मार्गावर १९, उस्‍मानाबाद शहरातील कारवाईत चार वाहने, तर तुळजापूरला चार वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. उस्‍मानाबादला दोन लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

शहरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागांत महसूल विभागाने कारवाई केली आहे. सकाळी सात वाजता शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात कारवाईस सुरुवात झाली. 

तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार राजेश जाधव, मंडळ अधिकारी आर. एस. नाईकनवरे, श्री. खोत यांच्यासह महसूल कार्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते. सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू होती. तीन दिवसांपूर्वी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला वाळू ठेकेदारांनी धमकावल्याने उस्मानाबाद उपविभागात ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. 

एमएच ०१ (एच-७५६९), (एमडब्ल्यूके) ६३३९, एएच ०४ (१७१३), एमएच ०४ (बीजी ४०९९) या चार वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. या चारही वाहनांतून वाळू नेत असल्याचे दिसून आले. परंतु, त्यांच्याकडे वाळू वाहतुकीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यातील तीन वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. तर एक वाहन महसूल विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले असल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली आहे. सुटीचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात शुकशुकाट होता. दरम्यान कारवाईची बातमी समजताच तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.

अधिकाऱ्यांचे मोबाईल खणाणले

कारवाईच्या दरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याच वेळी शहरातील अनेक पुढाऱ्यांचे फोनही अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर खणाणत होते.

Web Title: Sand smuggling action dhadaka