लातूर: नदीपात्रातून वाळू उपसा करणारी वाहने जप्त

latur
latur

लातूर : मांजरा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी सुरू असलेला बेकायदा वाळू उपसा तहसीलदार संजय वारकड व मुरूड (ता. लातूर) येथील सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या पथकाने सोमवारी (ता. २६) मध्यरात्री रोखला. रात्री अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा करणारी तीन वाहने पथकाने पकडली असून कारवाईने रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना झटका बसला आहे. पकडलेल्या वाहनांत एक जेसीबी, एक हायवा तर एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. मंगळवारी (ता. २७) पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. 

महसूल विभागाची नजर चुकवून वाळू माफियांकडून मांजरा नदी पात्रातील वाळूचा रात्रीच्या वेळी उपसा केला जात असल्याची माहिती श्री. वारकड यांना मिळाली होती. यामुळे त्यांनी मुरूड पोलिसांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री सारसा (ता. लातूर) शिवारातील मांजरा नदीपात्रात संशयित वाळू उपशाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. या वेळी तिथे जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातील वाळूचा उपसा करून हायवा वाहनात भरणे सुरू होते. तहसीलदार व पोलिसांचे पथक दिसताच वाहनचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर ही वाहने मुरूड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. रस्ता खराब असल्याने वाहने पोलिस ठाण्यात नेण्यासाठी रात्रच उजाडली. वाहने मुरूडकडे नेण्यात येत असतानाच सारसा ते मुरूड रस्त्यावर वाळूची बेकायदा वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पथकाला दिसून आले. हे ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सुरूवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधितांनी दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मार्चएण्डच्या धर्तीवर महसूल विभागाने रॉयल्टीच्या वसुलीसाठी जोरदार मोहिम हाती घेतली असून बेकायदा वाळू वाहतुक व उपसा करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

गंगाखेड वाळूची वाहतुक थांबली
मुरूड ते अंबाजोगाई रस्त्यावरच मांजरा नदीचे पात्र आहे. हा रस्ता उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याच्या सीमेवरून जात असल्याने वाळू माफियांकडून रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून वाळूची वाहतुक केली जाते. या वाळूची जादा दराने विक्री करून माफियांनी वाळू विक्रीच्या व्यवसायात चांगलेच बस्तान बसवले आहे. गंगाखेड (जि. परभणी) येथील गोदावरी नदी पात्रातूनही वाळूचा उपसा करून अनेक वाहने या रस्त्याने रात्रीच्या वेळी धावताना दिसतात. तहसीलदार वारकड व पोलिसांनी सोमवारी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईमुळे गंगाखेड येथून वाळूची वाहतूक करणारी वाहने जाग्यावरच थांबल्याची माहिती मिळाली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com