सावंगी, हर्सूल तलावांत निवांत करा वाळू उपसा!

संकेत कुलकर्णी
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - सावंगी आणि जटवाड्याच्या डोंगरांतून येणाऱ्या प्रवाहाला अडवून बांधण्यात आलेल्या सावंगी आणि हर्सूल येथील धरणांच्या कोरड्या पात्रांमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दररोज जेसीबी लावून मुरूम आणि पंप लावून वाळू राजरोस उपसली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही तलावांमधून जाणाऱ्या ऐतिहासिक नहरींवर यामुळे संकट ओढवले आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका याकडे डोळेझाक करत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद - सावंगी आणि जटवाड्याच्या डोंगरांतून येणाऱ्या प्रवाहाला अडवून बांधण्यात आलेल्या सावंगी आणि हर्सूल येथील धरणांच्या कोरड्या पात्रांमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. दररोज जेसीबी लावून मुरूम आणि पंप लावून वाळू राजरोस उपसली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही तलावांमधून जाणाऱ्या ऐतिहासिक नहरींवर यामुळे संकट ओढवले आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका याकडे डोळेझाक करत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाने देशातील नदी, तलावांमधून वाळू उपसण्यावर पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय दिलेला आहे. मात्र, महसूल प्रशासनाच्या सोयीनुसार त्याची अंमलबजावणी लांबलेली असते. शहरापासून जेमतेम चार ते सहा किलोमीटरच्या फेऱ्यात असलेल्या हर्सूल आणि सावंगी या दोन्ही धरणांची पात्रे पाऊस न झाल्याने यंदा कोरडीच राहिली आहेत. सावंगी धरणात पाण्याचा थेंबही नाही, तर मोजकेच पाणी असलेल्या हर्सूल तलावात शेतकऱ्यांनी गाळपेरा सुरू केला आहे. मात्र, तलावांच्या विस्तीर्ण पात्रात जागोजाग जेसीबीने खड्डे करून मुरूम आणि वाळूची वाहतूक सर्रास सुरू आहे. सर्वांच्या डोळ्यांदेखत दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याची चर्चा या भागात फिरताना ऐकायला मिळाली.

प्रत्येकाचे वाटे ठरलेले!
 हर्सूल तलावातून दिवसाला शंभरेक ट्रॅक्‍टर करतात वाळू वाहतूक
 जेसीबी, पोकलेन आणि डंपर बिनदिक्कत वावरताना दिसतात
 महसूल अधिकारी आणि पोलिसांना ‘द्यायचे ते दिले जाते’! 

बिनधास्त चाळतात वाळू
मलिक अंबरच्या दूरदृष्टीचे जगप्रसिद्ध उदाहरण असलेली नहर-ए-अंबरी सावंगीच्या डोंगरातून तलावाच्या पात्रातून शहराकडे येते. सावंगीच्या धरणात या नहरीचे बंब आहेत. जमिनीखालून येणाऱ्या या नहरीवर जागोजाग डल्ला मारून पाणी तर पळवले जातेच; शिवाय वाळू उपशासाठी नहरीलगतच खड्डे घेतल्यामुळे ही जलवाहिनी नष्ट होऊ लागली आहे. शहरापासून थोडे लांब असल्यामुळे महसूल प्रशासनाचे अधिकारी येथे ‘पाहुणचारा’व्यतिरिक्‍त क्वचितच फिरकत असतील. त्यामुळे धाडस वाढलेले तस्कर तलावातच चाळणी लावून निवांत वाळू चाळताना दिसतात. सगळा धंदा गुंडगिरीचाच असल्याने ‘सज्जनांनी याकडे पाहायचे नसते’ हे इथल्या नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे.

वीटभट्ट्यांना फुकट माती
जटवाड्यापासून हर्सूल तलावापर्यंत नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी वीटभट्ट्यांचा सुकाळ झाला आहे. शहरात वाढत्या बांधकामांमुळे त्यांचाही व्यवसाय जोरावर आहे. वीटभट्टीवाल्यांनी नदीपात्र पोखरून टाकले आहे. उरलेले अतिक्रमणांनी घेरले आहे. त्यामुळे तलावापर्यंत पाण्याचा प्रवाह पोचतच नाही. परिणामी तलाव कोरडे राहतात. या परिसरातून दररोज शेकडो ट्रॅक्‍टर अवैध वाळू, माती उपसा होत असताना महापालिका, महसूल विभाग आणि पोलिस या तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

थत्ते नहर बेवारस
एकेकाळी बेगमपुऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या थत्ते नहरीचे नळ खाम नदीच्या पात्रातून आणि हर्सूल तलावाच्या पोटातून येतात. जेसीबीने जागोजाग मोठमोठाले खड्डे घेत सुटलेल्या माफियांना त्याचे काय महत्त्व! त्यांनी तलावात खड्डे करताना अनेक ठिकाणी नहरीला भगदाडे पडली आहेत. खोलीचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या अनेक बालकांचा या खड्ड्यांमध्ये बुडून बळी गेल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मात्र वाळू, गाळ आणि मुरूम चोरांना कुणीही अडवले नाही.

Web Title: Sand stems in Savangi and Harsul Lake