‘या’ तालुक्यात वाळू चोरीला लगाम लागेना

bhandara-sand-1505974384-3345703.jpeg
bhandara-sand-1505974384-3345703.jpeg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः धर्माबाद तालुक्यातून वाहनाऱ्या गोदावरी नदीपात्रातून व हुनगुंदा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट ओहरलोड वाहतूक धर्माबादेत केली जात आहे. कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन व्यस्त आहे. याचा फायदा घेत वाळू चोरटे जोमात आहेत. रात्रीला होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाळू चोरटे या धंद्यावर ‘रग्गड कमाईतून गब्बर’ झाल्याने अनेकांच्या अंगावर ते रात्रीला धावून येत आहेत.


पुन्हा जोमाने वाळू चोरी
कोरोना आजाराने देशात थैमान घातले आहे. प्रशासनातील महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून व हुनगुंदा वांजरा नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून मनूर, बामणी, सिरसखोड मार्ग धर्माबाद शहरात हैदोस घालत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. संचारबंदी असूनही वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात चालू आहे. वाळू चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू चोरट्यांविरोधात यापूर्वी ‘सकाळ’मध्ये ‘कोरोनामुळे वाळू चोरट्यांचे चांगभले’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्या वेळी दोन दिवस वाळू चोरटे वाळू वाहतूक बंद ठेवली होती. मात्र, लॉकडाउन असून सुद्धा पुन्हा जोमाने वाळू चोरी करीत आहेत.

सद्यःस्थितीत कोरोना आजाराला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातील उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे व त्यांची यंत्रणा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड व पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा स्टाफ लॉकडाउन व कोरोना विरोधात लढत असून त्याचाच फायदा हे वाळू चोरटे घेत आहेत.


अवैध वाळू ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई 
तालुक्यातील संगम, मनूर येथील वाळू चोरटे धर्माबाद ठाण्याच्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना व महसूलच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आहेत. ते वाळू चोरट्यांना वेळोवेळी माहिती देत असतात. यामुळे वाळू चोरट्यांचे मनोबल वाढल्याने शंकरगंजमध्ये धुमाकूळ घालत आहेत. वाळू वाहतुकीमुळे शंकरगंजमधील नागरिकांची रात्रीला झोप उडाली आहे. या वाहतुकीला कंटाळून सोमवारी (ता. २७) पहाटे चार वाजता अवैध वाळूचा ट्रॅक्टर (एपी २५ - एल १७२१) नागरिकांनी अडविले व तहसीलदार यांना मोबाइलवरून माहिती दिली. तेंव्हा लगेच तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी मंडळ अधिकारी नामदेव माळोदे यांना घटनास्थळी पाठविले. मंडळ अधिकारी माळोदे यांनी वाळूचा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयासमोर लावले. तहसीलदार शिंदे यांच्या आदेशावरून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com