सत्तरी पार केलेलं तरुण जोडप.. बाबा भांड, आशा भांड....

baba bhand
baba bhand

औरंगाबाद : प्रकाशन विश्वातील एक मोठं नाव म्हणजे बाबा भांड. हे एक मोठे लेखक आहेत. त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहलं आहे. माणसं ओळखण्याचा वेगळा हातखंडा त्यांचा आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकाशने काढली आहेत. त्यांच्या कारकिर्दीतून आजच्या तरुणांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. सत्तरी पार केलेली जोडी बाबा भांड आणि आशा भांड यांची संदीप काळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत.. 

आयुष्याची सुरुवात कशी झाली हे सांगताना बाबा भांड म्हणाले, १९७२ च्या दुष्काळात मला एमए इंग्लिश करायचं होतं, मात्र गावाकडे वाईट परिस्थिती आणि नोकरीशिवाय पर्याय नव्हता, त्या दुष्काळात मी औरंगाबाद विद्यापीठात गेलो. त्यावेळी माझी आणि आशाची भेट झाली. आपला नवरा स्वप्न बघतोय आणि त्याच्यामागे हिमतीने उभं राहवं असं तिने ठरवलं, त्यामुळे हा संसार सुरु झाला. आज जे मी काही लेखक आणि प्रकाशक म्हणून आहे, त्यात आशा हिचा खूप मोठा वाटा आहे. कारण सुरुवातीलाच आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. बाहेरची कामे मी पाहणार आणि घरातील जबाबदाऱ्या, कुटुंब, नातेसंबंध तिने पाहायचं ठरवलं होतं. याशिवाय पाणलोट क्षेत्राचे काम, ३० वर्षे  अपंग आणि मूक-बधिर मुलांची कामे, वृद्धाश्रम आम्ही चालवतो, हे सर्व सुरु होतं, त्यात मोलाची साथ तिने मला दिली. 

लग्नावेळी देखील आशा यांनी फक्त बाबा भांड यांचा स्वभाव पाहून पसंती दर्शवली होती. त्याबाबत आशा म्हणाल्या, "आम्ही एकाच शाळेत सर्व्हिसला होतो, त्यामुळे तिथेच एकमेकांबद्दल ओळख वाढली. तेथील एका शिक्षकाने माझ्या वडिलांना हे स्थळ सुचवलं. आम्ही दोघीच बहिणी असल्याने सुरुवातीपासून लाडात वाढलेली होती, त्यामुळे वडिलांना थोडी काळजी वाटत होती. मात्र मी यांच्याशीच लग्न करायचं मनात ठरवलं होत. एक व्यक्ती म्हणून बाबा भांड मला खूप आवडले. लग्न करून सुरुवातीला मी पैठण या छोट्या गावातील छोट्या घरात आले."    

सुरुवातीला संसार आणि करिअरचा गाडा सोबत नेताना अनेकदा कुटुंबियांना वेळ देणं शक्य होत नाही, त्याबाबत आशा म्हणाल्या की, नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असं वाटते की, नवऱ्याने आपल्यासोबत फिरावं, सिनेमाला जावं, वेळ द्यावा. मात्र त्यांच्यातील लेखणी हा गुण सर्वसामान्य नाही,  तर अशा गुणाला आपण वाव दिला पाहिजे. आपण नाही करू शकत ते सर्व हे करत आहेत. त्यामुळे मी स्वतःच्या मनाची समजूत घातली, इतकं चांगलं कार्य करत आहेत तर त्यांना अडवलं नाही पाहिजे. त्या वेळात मला जे छंद आहेत, त्यात मी वेळ दिला. असा आमचा संसार सुरु झाला. 

साधारणपणे लेखणीला सुरुवात कधी झाली, याबाबत बाबा भांड म्हणाले, सहाव्या वर्गात असताना मी डायरी लिहिली, त्यावेळी माझ्या लेखनाला चालना मिळाली. सुदैवाने मला पदोपदी चांगले शिक्षक भेटले. त्यानंतर आठवीत स्काऊट गाईडमध्ये असताना मला राष्ट्रपती पदक मिळाले. स्काऊट गाईड जांभोरीच्या निमित्ताने अनेक देशांत फिरत आले. माझ्यातील लेखकाला ही सर्व सामग्री खूप महत्त्वाची ठरली. ज्यावेळी मी या सर्व गोष्टींचे प्रवासवर्णन लिहिले, त्यावेळी ते प्रकाशन करण्यासाठी कोणी भेटले नाही. त्यानंतर मी सरस्वती भवनमध्ये मी ऍडमिशन घ्यायला गेलो, त्यावेळी माझे मार्क बघून तेथील शिक्षक म्हणाले, एवढे चांगले मार्क घेऊन तू डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकतोस, तू सायन्स घे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, मला लेखक व्हायचं आहे. यावर ते बोलले, तुझ्या वडिलांना घेऊन ये, माझे वडील लहानपणीच वारले आणि आई गावाकडे होती. आईची इच्छा होती, मला जे करायचं आहे ते मी केलं पाहिजे. त्यातून पुढे सरांनी मला पीयूशी कलाशाखेत प्रवेश दिला. मी खूप भाग्यवान आहे, मला पियुषिला भालचंद्र नेमाडे शिकवायला होते. माझं पाहिलं लिखाण ज्यावेळी मी नेमाडे सरांना दाखवलं, त्यावेळी ते म्हणाले की, बाबा तू खूप चांगलं काम केलं परंतु मराठवाड्याबाहेर खूप अडचण आहे. तू स्वतःप्रकाशन सुरु कर. १९७२ चा दुष्काळ मला पावला आणि मला कमावती बायको मिळाली..! तिने सांगितलं, मी माझ्या पगारात आपलं कुटुंब चालवेल, तुमच्या पगारात तुम्ही प्रकाशने करा, त्यातूनच १९७५ ला मी माझं पाहिलं  पुस्तक  "लागेबंधे" चे प्रकाशन केलं.  या पुस्तकाला भालचंद्र नेमाडे यांनी शीर्षक दिलं होते. याशिवाय माझा नवरा लेखक व्हावा असं तिने पाठींबा दिला, त्यामुळे माझ्या बायकोला मी प्रकाशिका म्हणून तयार केलं आणि प्रकाशनाला सुरुवात केली. 

पाहिलं पुस्तक हातात आलं त्यावेळी आलेल्या अनुभवाबाबत भांड म्हणाले, ज्यावेळी पाहिलं पुस्तक प्रकाशित झालं, खूप आनंद होता. त्यावेळी माझ्या मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे ते माझ्या मुलीच्या जन्माप्रमाणेच होतं. मात्र मी सायकलला १० प्रती लावून औरंगाबादमधील १०० शाळांत फिरलो, मात्र एकही पुस्तक विकले गेले नाही. ११ व्या दिवशी गायकवाड नावाच्या हेडमास्तरांनी दोन प्रती घेतल्या, चहा पाजला.. माझ्या आयुष्यातील खऱ्या कमाईला तेव्हापासून सुरुवात झाली. 

हे सर्व सुरु असताना एकूण कुटुंबातील वातावरण कसं होत, याबाबत आशा म्हणाल्या की, लग्नाआधी जेव्हा माझ्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या त्यावेळी वडील वाड्यांमध्ये घर घ्यायचे. याच कारण म्हणजे वाड्यात घरमालक, शेजारी असं मिळून मिसळून राहायचे. ५-५० लोकं एकमेकांचे नातेवाईक म्हणून राहायचे, अशा वातावरणात मी लहानाची मोठी झाली. त्यामुळे मोठ्या माणसांशी कसं वागायचं, नाती निर्माण करणं याबाबत संस्कार मला लहानपणापासूनच झाले होते. इथे सासरी आल्यावर माझ्या सासूचा मला खूप पाठिंबा मिळाला. मी आयुष्यात जे काही केलं, ते त्यांचा आधार आणि पाठींबा होता म्हणूनच मी करू शकले. कोणत्याही गोष्टीत मला काही अडलं तर मी त्यांना विचारायचे. आमचं सासू सुना नाही तर मायलेकीच नातं होतं. आमच्या संसाराला, घराला, व्यवसायाला त्यांचा भरभक्कम आधार होता.  

साकेत प्रकाशन लोकांपर्यंत लवकर पोहचले, याचे कारण सांगताना बाबा भांड म्हणाले, पुस्तक प्रकाशनासोबत वितरणाची देखील अडचण होती. त्यावेळी आम्ही ठरवलं की, पुस्तक प्रकाशन हे एक सामाजिक जबाबदारीच काम आहे. त्यामुळे गेल्या ४२ वर्षांत आम्ही कुठल्याही लेखकाकडून पैसे घेऊन छापलं नाही. प्रत्येक लेखकाला आम्ही मानधन दिले. पुस्तक जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी सोमवारी बाहेर पडायचो आणि शनिवारी परत यायचो. हे सर्व काम आशा पाहायची. पुस्तक वितरणातील ज्या अडचणी होत्या, त्या आम्ही खूप बारकाईने पहिल्या. यासाठी मराठवाड्यात काहीजणांच्या मदतीने ग्रंथालय सुरु केले. त्यावेळी किमान २००-४०० ग्रंथालयांना पुस्तके भेट दिली. ग्रंथालये वाढली तर प्रकाशकांचा व्यवसाय वाढू शकेल. यातून विकलं काय जातं? वाचकांना काय पाहिजे? हा अनुभवाचा भाग होता, त्यातून हा प्रवास नीट होऊ शकला. 

मी ज्या गोष्टी ओळखू शकलो नाही, त्या गोष्टी नवी पिढी आमच्या पन्नाशीमध्ये ओळखू लागली. वयाच्या पन्नाशीला मी आणि माझ्या पत्नीने हा कारभार साकेत आणि प्रतिमा यांच्या ताब्यात दिला. ही नवी पिढी आज खूप जोमाने काम करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच व्यवसायातील काही तत्व पाळणे फार महत्त्वाचं आहे. लेखकाला सन्मानाने आहे ते मानघन दिल पाहिजे, पुस्तक प्रकाशाने छापलं पाहिजे, मात्र पुस्तकात लेखकाचा सिंहाचा वाटा असतो. हा धंदा किंवा व्यवसाय नाही तर सामाजिक जबाबदारीच काम आहे. आमचं भाग्य म्हणजे, मराठीतील सर्व नामांकित लेखकांनी आमच्यावर विश्वास टाकला. विश्वासाने आम्हाला मदत केली. त्यामुळेच आज ७०० च्या जवळपास लेखक आहेत, २००० च्या जवळपास शीर्षक झाले आहेत. हे सगळं करत असताना माझे गुरुवर्य भालचंद्र नेमाडे यांनी मला सांगितलं होतं की, प्रत्येक लेखकाकडून करार करून घे, कराराप्रमाणे वाग. ज्यावेळी ४० वर्षांनंतर गावात आम्ही बुकस्टॉल टाकला. तेव्हा मी नेमाडेंना म्हणालो, आज तुमच्या शिष्याने तुमचं बोलणं खरं करून दाखवलं आहे. यामध्ये मी एकटा नाही, आमचं टीमवर्क आहे. त्यातूनच हे काम उभं राहील आहे. 

एका लेखकाची बायको म्हणून कसा अनुभव होता, हे सांगताना आशा म्हणाल्या की, लोकं मला ओळख विचारायचे त्यावेळी मी नाव सांगायचे 'आशा बाबा भांड' त्यावेळी लोकांची प्रतिक्रिया असायची, "ते मोठे लेखक, बाबा भांड का?"  त्यावेळी मला अभिमान वाटायचा की, आपण एका मोठ्या लेखकाची पत्नी आहोत. यासोबतच परदेशातील आलेल्या अनुभवाबाबत आशा पुढे म्हणाल्या, आम्ही खूप देश फिरलो, मात्र आपल्या भारतासारखा देश कुठेच नाही. याठिकाणी आपण सगळे ऋतू अनुभवतो. आपण खूप भाग्यवान आहोत, की आपण भारत देशात जन्म घेतला. 

एक उत्तम प्रकाशक होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत बाबा भांड यांना विचारले असता, ते म्हणाले, स्वतःशी प्रामाणिक राहणे हे महत्त्वाचे आहे. लेखक, विक्रेते, वाचक या सर्वांशी तुमचे संबंध सलोख्याचे असले पाहिजे. लेखक आणि प्रकाशकामध्ये अनेकदा संशयाचे वातावरण असते, मात्र ते असू नये. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवण्याची फार गरज आहे. या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर या व्यवसायाला खूप चांगले दिवस येऊ शकतात.  

गेल्या तीन वर्षांत प्रकाशन क्षेत्रात आलेल्या मंदीचे नेमके कारण काय, याबाबत बोलताना भांड म्हणाले, गेल्या ४५ वर्षांत फक्त हे तीन वर्षे फारच मंदीचे आहेत. याबाबत अनेक प्रकाशक आणि लेखकांशी मी बोललो. नेमकं कारण अजून स्पष्ट झाले नाही. अशीच परिस्थिती राहिली तर प्रकाशकांना पुस्तक काढणे कठीण होईल. साकेत आणि प्रतिमा नेहमी याच विचारात असतात की, आज देशभरात काय ट्रेंड आहे, काय वाचलं जात आहे. त्यानुसार ते विचार करत आहे. 

आतापर्यंतच्या प्रवासात काही करायचं राहून गेलंय असं वाटतंय का? असं विचारल्यावर आशा भांड म्हणाल्या की, आतापर्यंतचा आमचा जो प्रवास आहे, तो लिहून काढायचा आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला याबाबत माहिती होईल. 

हा सर्व कारभार सांभाळत असताना तब्येतीची काळजी घेण्याबाबत आशा पुढे म्हणाल्या की, खेळ, नृत्याची आवड असल्याने व्यायामाची सवय होती. नंतर देखील मी तब्येतीकडे लक्ष दिले. चाळीशी गाठल्यानंतर आमच्या आयुष्यात आम्ही "सिद्ध समाधी योग" सुरु केलेला. यामध्ये योग, आरोग्य, आहार या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. यामुळे आयुष्यात खूप बदल होत गेला. माझ्यातील बदल बघून बाबा भांड यांनी देखील कोर्सला सुरुवात केली. आजही आमचे ते नित्यनियमाने सुरु आहे.

औरंगाबादमधील बाबा आणि आशा हे सत्तरी पार केलेलं तरुण जोडपं..  आजही मोठ्या उत्साहाने ते काम करत आहेत. विविध उपक्रम राबवत आहेत. आजच्या तरुणांनी यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, हे नक्की..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com