स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही कोरोनाशी लढा

सुभाष बिडे 
Wednesday, 22 April 2020

स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात या कामगारांनी शहर व परिसराच्या स्वच्छतेचा विडा उचलला असल्याचे चित्र जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरात सर्वत्र दिसत आहे. कोरोना टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. स्वतःच्या जिवांची काळजी घेत सर्व नागरिक घरातच आहेत. घंटागाडी कामगार मात्र नित्यनेमाने सेवा देत आहेत.

घनसावंगी (जि.जालना) -  कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असून, घरातच राहत आहे. घंटागाडी कामगार त्यास अपवाद आहेत. स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आलेल्या परिस्थितीला सामोरे जात या कामगारांनी शहर व परिसराच्या स्वच्छतेचा विडा उचलला असल्याचे चित्र जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरात सर्वत्र दिसत आहे. 

कोरोना टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. स्वतःच्या जिवांची काळजी घेत सर्व नागरिक घरातच आहेत. घंटागाडी कामगार मात्र नित्यनेमाने सेवा देत आहेत. रोज सकाळ, सायंकाळ शहरातील विविध भागांसह बाजारपेठ तसेच अंबड, घनसावंगी रस्त्यांवरील जुन्या आयटीआय परिसर ते कै.दत्तासाहेब देशमुख विद्यालयाच्या परिसरापर्यंत या महिलांसह पुरुष सफाई कामगार नियमित सफाई करतात.

हेही वाचा : कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

विविध प्रकारांचा कचरा ते हाताळतात. अशा वेळी संसर्ग झालाच तर कुटुंबाचे काय होणार असे एक ना अनेक प्रश्‍न त्यांना पडतात. तरीही कोरोनाची डोक्‍यावर टांगती तलवार घेऊन ते निःस्वार्थपणे काम करीत आहेत. कोरोनाची भीती मनात आहेच . कुटुंबाच्या आरोग्याची चिंता लागून असते; परंतु असाही विचार येतो, की आपल्या कुटुंबासारखे अन्य लोकांचीही कुटुंबे आहेत. आपण आपले काम केले नाही तर सर्वत्र कचऱ्यांचे साम्राज्य पसरेल आणि त्यातूनही विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते आपल्या कामाने जर अन्य लोकांचे आरोग्य राखले जात असेल तर ती एक सेवा आहे. घंटागाडी कामाच्या वेतनावर सर्व कुटुंब अवलंबून आहे.

हेही वाचा :ता सारेकाही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी.... 

काम बंद ठेवले तर उदरनिर्वाह चालणार कसा, म्हणून आलेल्या परिस्थितीला समोर जात सर्वांचे आरोग्य राखण्याचे काम केले जात आहे, असे घंटागाडी कर्मचारी सांगत आहेत. 

घंटागाडीतून शहराच्या विविध भागांची स्वच्छता करत कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांना कुठेतरी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आपल्या परीने आमचा आहे. कचरा संकलनातून दिवसातून अनेक लोकांशी संपर्क येतो. कोरोनाची भीतीही वाटते. तरीही आवश्‍यक खबरदारी घेत आहोत. कचरा घेऊन येणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, गर्दी टाळण्याबाबतची जागृतीही आम्ही करीत आहोत. 
- राजू थोरात, 
सफाई कामगार घनसावंगी 

कोरोनासारख्या महामारीच्या काळात नगरपंचायतीचे कर्मचारी सफाई करण्याचे काम करून शहरातील सर्वच नागरिकांना या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कामांचे खरोखर कौतुक होणे गरजेचे आहे. नगरपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज, मास्क आदी साधने दिली आहे; तसेच नियमित आरोग्य तपासणी करीत असून, त्यांची काळजी घेण्यास नगरपंचायत कटिबद्ध आहे. 
- प्राजक्ता देशमुख, 
नगराध्यक्षा, घनसावंगी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitation workers also fight Corona