नांदेडमधील एक लाख  निराधार मानधनापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

लाभार्थ्यांना प्रति महिना मिळणाऱ्या ६०० रुपयांच्या अनुदानात उपजीविका कशी चालवावी, याबाबतची चिंता निराधार, वृद्ध व गरीब व्यक्तींना गेल्या कित्तेक वर्षा पासून सतावत आहे. त्यानुषंगाने दरमहा मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ केव्हा होणार, याबाबत निराधार, वृद्ध, गरीब लाभार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. परंतु त्यातच गेल्या दाेन महिन्यांपासून त्यांना मानधन मिळणे बंद असल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

नांदेड : जिल्ह्यातील सुमारे एक लाखावर निराधारांना गेल्या दाेन महिन्यांपासून मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. तुटपुंज्या मानधनावर जगणाऱ्यांना निराधारांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार, विधवा, दुर्धर रुग्ण, अपंग, परित्यक्त्या लाभार्थ्यांना. श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) लाभार्थ्यांना दरमहा ६०० रुपये प्रमाणे अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती याेजनेचा लाभपण निराधारांना दिला जाताे.

२१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना राज्य सरकारच्या व बीपीएल यादीत समाविष्ट असलेल्या निराधारांनाच केंद्र सरकारच्या या याेजनेचा लाभ देण्यात येताे. परंतु मार्च व एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील विध याेजनांच्या जवळपास एक लाखावर निराधारांना केंद्र शासनाकडून या आर्थिक वर्षाचे मानधन अद्याप मिळणे बाकी आहे. त्यामुळे निराधारांना प्रत्येक दिवशी बॅंकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. केंद्र शासनाकडून निराधारांना अनुदान मिळाले नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

अनुदानाने उपजीविकेचा प्रश्न
याेजनेत समाविष्ट सगळ्या लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणारे ६०० रूपयांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. शासन निर्णयानुसार निराधार, वृद्ध व गरीब लाभार्थ्यांना प्रत्येकी केवळ ६०० रुपयांप्रमाणे अनुदानाचा लाभ दिला जाताे. हा लाभ फार कमी असल्याने निराधारांना महागाईच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

लाभार्थ्यांना प्रति महिना मिळणाऱ्या ६०० रुपयांच्या अनुदानात उपजीविका कशी चालवावी, याबाबतची चिंता निराधार, वृद्ध व गरीब व्यक्तींना गेल्या कित्तेक वर्षा पासून सतावत आहे. त्यानुषंगाने दरमहा मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ केव्हा होणार, याबाबत निराधार, वृद्ध, गरीब लाभार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. परंतु त्यातच गेल्या दाेन महिन्यांपासून त्यांना मानधन मिळणे बंद असल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

Web Title: sanjay gandhi niradhar yojana implementation not upto the mark in Nanded