
Me Honar Superstar : संकल्प काळे याची "मी होणार सुपरस्टार"मध्ये निवड
वडीगोद्री : स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर येत्या 10 जून पासून सुरू होत असलेल्या "मी होणार सुपरस्टार" (छोटे उस्ताद ) पर्व 2 या गायनाच्या रियालटी शो मध्ये अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील 10 वर्ष वयाचा चिमुकला संकल्प संभाजी काळे याची निवड झाली आहे.
या रियालिटी शोमध्ये महाराष्ट्रातील 4 ते 14 वयोगटातील असंख्य स्पर्धकांनी निवड चाचनी (ओडिशन) दिले. या निवड चाचणीमधून राज्याच्या विविध भागातील टॉप 12 रत्नांची या शोमध्ये निवड करण्यात आली.या अंतिम निवडीमध्ये जालना जिल्हातील 10 वर्षे वयाचा संकल्प काळे हा आपल्या गायनाची कला सादर करणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रीय गायनाचार्य गजानन केचे यांच्या कडे संकल्प शास्त्रीय गायन शिकत आहे. संकल्प चे वडील संभाजी काळे हे गायक असल्याने ते रोज त्याच्याकडून पाच तास सुगम गायनाचा रियाज करून घेतात. संकल्प हा संभाजीनगर येथील भाग्यलक्ष्मी सरला गुरूसहानी मेमोरियल शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे.
"मी होणार सुपरस्टार" या रियालिटी शोमध्ये संकल्प याची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा कार्यक्रम दर शनिवारी व रविवारी रात्री 9 वा स्टारप्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे.